इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशातील अनेक राज्यात शासकीय अधिकाऱ्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होत आहेत. त्यात दिवसेंदवस कमी नाही तर वाढच होत आहे. आता बिहारमध्ये आणखी एक प्रचंड मोठे भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले आहे. सहरसा कारागृहाचे अधीक्षक सुरेश चौधरी याच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच्या मुझफ्फरपूर आणि सहरसा येथील ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. त्यात मेठे घबाड हाती लागले आहे.
विशेष म्हणजे आतापर्यंतच्या शोधात सहा कोटींहून अधिक किमतीची जंगम आणि जंगम मालमत्ता सापडली आहे. तपासाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तुरुंग अधीक्षकाची संपत्ती 18-20 कोटींपर्यंत पोहोचू शकते. स्पेशल मॉनिटरिंग युनिटने भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई केली आहे
स्पेशल मॉनिटरिंग युनिट (SVU)च्या माहितीनुसार, सुरेश चौधरी याच्या विरोधात त्याच्या 1,59,07,928 रुपयांच्या उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्तेसाठी FIR नोंदवण्यात आला आहे. मुझफ्फरपूरमध्ये त्याने आलिशान घर बांधले आहे. घरांच्या भव्यतेवर आणि सजावटीवर पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आल्याचे दिसून आले आहे. दोन्ही घरांची किंमत सुमारे चार कोटींहून अधिक आहे. काळ्या पैशाचा मोठा हिस्सा जमिनीत खर्च झाला आहे. आतापर्यंत 3 कोटींहून अधिक रकमेची 15 जमिनींची खरेदी खते प्राप्त झाली आहेत. बेनामी मालमत्ताही मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. SVU ला भारत-नेपाळ सीमेवर अशा अनेक भूखंडांची माहिती मिळाली आहे, त्या संदर्भात तपास केला जात आहे.
ब्रह्मपुरा, मुझफ्फरपूर येथील गल्ली क्रमांक 5 मधील घर, सहरसा येथील सरकारी निवासस्थान आणि कार्यालया शिवाय झडती घेतली. यावेळी कारागृहाच्या आत असलेल्या अधीक्षकाच्या कार्यालयात ठेवलेल्या तिजोरीतून 10 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. त्याचवेळी मुझफ्फरपूरच्या घरातून एक लाखाची रोकड सापडली आहे.
सुरेश चौधरी आणि त्याच्या अवलंबितांच्या नावावर आतापर्यंत 38 हून अधिक बँक खाती आणि मुदत ठेवी सापडल्या आहेत. अनेक लॉकरही सापडले आहेत. 17 लाख रुपये मुझफ्फरपूर येथील स्टेट बँकेच्या खात्यात जमा आहेत तर 3 लाख रुपये पंजाब नॅशनल बँकेमध्ये जमा आहेत. झडती दरम्यान लाखोंचे दागिनेही सापडले आहेत.
सुरेश चौधरी याला ४ मुले आहेत. यातील एका मुलीने 15 लाख भरून खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. एक मुलगा बंगळुरूमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे तर दुसरा मुझफ्फरपूर मेडिकल कॉलेजमध्ये शिकत आहे. तर एक जण मुझफ्फरपूरमधील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत आहे. मुलांचे शिक्षण आणि विमान प्रवास यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आल्याचेही या तपासात स्पष्ट झाले आहे.