मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक असलेल्या करणवीर बोहरासह सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करणवीर बोहराने एका ४० वर्षीय महिलेची पैसे घेऊन फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्याचवेळी त्याला जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या. ओशिवरा पोलिसांनी अभिनेत्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
टीव्ही कलाकार, सेलिब्रिटी यांच्याविषयी आर्थिक फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत असतात. कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार करता करता अनेक बड्या लोकांशी त्यांचे संपर्क येत असतात. आपली जीवनशैली जपण्यासाठी, पैशांची तजबीज करण्यासाठी कर्ज स्वरुपात पैसे घेतले जातात आणि त्याची परतफेड करताना मात्र आढेवेढे घेतात. अनेक प्रकरणांमधून हेच समोर आले आहे. आता करनवीर बोहरामुळे पुन्हा एकदा ही बाब अधोरेखित झाल्याचे दिसून येत आहे.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेने सांगितले की, मनोज बोहरा उर्फ करणवीर बोहरा याने तिच्याकडून १.९९ कोटी रुपये उसने घेतले होते. २.५ टक्के व्याजासह पैसे परत करण्याचे आश्वासन अभिनेत्याने दिले होते, परंतु केवळ १ कोटी रुपये परत करण्यात आले. महिलेचा आरोप आहे की जेव्हा तिने तिचे पैसे परत मागितले तेव्हा बोहरा आणि त्यांची पत्नी तजिंदर सिद्धू यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही, वरून गोळ्या घालण्याची धमकी देखील दिली.
या प्रकरणी ओशिवरा पोलिसांचे म्हणणे आहे की, करणवीर बोहरा आणि इतरांविरुद्ध तपास सुरू करण्यात आला असून, लवकरच त्यांचे जबाब नोंदवले जातील. गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधित महिलेला बोहराकडून व्याजासह पैसे भरावे लागतील.