इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हैदराबादमध्ये खेळल्या जात असलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात आज धावांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. उल्लेखनिय म्हणजे, भारताचा सलामीवीर शुभमन गिलने तडाखेबंद द्विशतक झळकावले आहे. सलग तीन षटकार मारुन गिलने द्विशतक पूर्ण केले. द्विशत करणारा तो जगातील सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. दरम्यान, भारताने ५० षटकात ३४९ धावा केल्या असून न्यूझीलंडला ३५० धावांचे लक्ष्य दिले आहे.
टीम इंडियाने ५० षटकांत आठ विकेट गमावत ३४९ धावा केल्या. शुभमन गिलने सर्वाधिक २०८ धावांची खेळी खेळली. तो नाबाद राहिला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून द्विशतक झळकावणारा तो पाचवा फलंदाज ठरला. शुभमनशिवाय रोहित शर्माने ३४, सूर्यकुमार यादवने ३१, हार्दिक पांड्याने २८ आणि वॉशिंग्टन सुंदरने १२ धावा केल्या. विराट कोहली ८ आणि इशान किशन ५ धावा करून बाद झाले. शुभमन गिलने १९व्या वनडे सामन्यात द्विशतक झळकावले. लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर लागोपाठ तीन षटकार मारून त्याने २०० धावांचा टप्पा गाठला. वनडेत द्विशतक झळकावणारा तो पाचवा भारतीय फलंदाज आहे.
https://twitter.com/BCCI/status/1615678049303007233?s=20&t=Usn28yncl7bytjVgkapb5g
भारत आणि बांगलादेश यांच्यात नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत (IND vs BAN) सलामीवीर इशान किशनने केवळ 131 चेंडूत 210 धावांची शानदार खेळी केली. ही झंझावाती खेळी खेळण्यासोबतच तो भारतासाठी द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला. पण, शुभमन गिलने त्याचा विक्रम मोडला आणि हा विक्रम आपल्या नावावर केला. शुभमन गिलने केवळ २३ वर्षे १३२ दिवसांच्या वयात एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. तर इशान किशनने वयाच्या २४ वर्षे १४५ दिवसांत हा पराक्रम केला.
वनडेमध्ये द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू
२३ वर्षे १३२ दिवस – शुभमन गिल विरुद्ध न्यूझीलंड, वर्ष २०२३
२४ वर्षे १४५ दिवस – इशान किशन विरुद्ध बांगलादेश, वर्ष २०२२
२६ वर्षे १८६ दिवस – रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, वर्ष २०१३
२७ वर्षे १९७ दिवस – रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका, वर्ष २०१४
२८ वर्षे १०१ दिवस – फखर जमान विरुद्ध झिम्बाब्वे, वर्ष २०१८
न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने १३९.६ च्या स्ट्राइक रेटने फक्त १४९ चेंडूत २०८ धावांची धडाकेबाज खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १९ चौकार आणि ९ गगनचुंबी षटकार दिसले. गिलच्या या झंझावाती खेळीमुळे भारतीय संघाला ५० षटकांत ८ गडी गमावून ३४९ धावांची मोठी मजल मारता आली.
https://twitter.com/BCCI/status/1615681062541352960?s=20&t=Usn28yncl7bytjVgkapb5g
भारतीय संघाने नुकतीच श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर तीन सामन्यांची वनडे मालिका ३-० ने जिंकली आहे. अशा स्थितीत न्यूझीलंड संघासाठी भारताला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करणे सोपे नसेल. किवी संघ ३४ वर्षांपासून भारताला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करू शकलेला नाही, अशा परिस्थितीत टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघ इतिहासाची पाने उलटून ३४ वर्षांचा दुष्काळ संपवू इच्छित आहे.
दोन्ही संघ असे
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड: डेव्हॉन कॉनवे, फिन ऍलन, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (सी), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, हेन्री शिपले, ब्लेअर टिकनर.
https://twitter.com/BCCI/status/1615679448657047552?s=20&t=Usn28yncl7bytjVgkapb5g
Cricket Ind Vs NZ 1 ODI Shubman Gill Double Century