मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या पाठीच्या दुखण्याने ग्रासलेला भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह याचा जलवा आयपीएलच्या यावर्षीच्या मोसमात बघायला मिळणार नाही, अशी माहिती पुढे येत आहे. सध्या नॅशनल क्रिकेट अकादमी येथे त्याचा गोलंदाजीचा सराव सुरू असला तरीही तो आयपीएलपर्यंत फीट होणार नाही, असे कळते.
जसप्रित बुमराह आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. तो मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का आहे. गोलंदाजीचा क्रम त्याच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, असे जणू समीकरणच झालेले आहे. पण आता मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी बुमराह नसेल तर मोठ्ठा धक्का असणार आहे. जसप्रित बुमराह गेल्यावर्षी टी-२० वर्ल्डकपपूर्वी एक मालिका खेळला होता. त्यानंतर तो भारतीय संघात परतलेलाच नाही. वर्ल्डकपपूर्वी तो ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका खेळला होता. त्यानंतर पाठीच्या दुखण्याने त्याला घरी बसवलं. पुढे भारतीय संघ श्रीलंका, न्युझीलंड यांच्याविरुद्ध मालिका खेळला, पण त्यात बुमराह नव्हता. तो एनसीएमध्ये सराव करीत असल्याने अॉस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत कमबॅक करेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु, तसे झाले नाही. शेवटच्या दोन सामन्यांमध्ये तरी तो भारतीय संघात असेल, असा अंदाज होता, पण तेही झाले नाही. त्यामुळे आता आयपीएलमध्ये खेळू शकणार की नाही, याबद्दल शंका व्यक्त होत होती.
आठ महिन्यांपासन बाहेर
टीम इंडियाचा अत्यंत महत्त्वाचा गोलंदाज जसप्रित बुमराह गेल्या आठ महिन्यांपासून संघाच्या बाहेर आहे. हे अत्यंत दुर्दैवी मानलं जात आहे. कारण बुमराह हा टीम इंडियाचा आघाडीचा गोलंदाज आहे. अशात आयपीएल २०२३ मध्ये तरी तो खेळेल, असे वाटत होते. पण त्यालाही तो मुकणार असल्याचे कळत आहे.
जोफ्रा आर्चरचा पर्याय
जसप्रित बुमराह आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही, असा अंदाज असल्यामुळे मुंबई इंडियन्सने दुसरा पर्याय तयार ठेवला आहे. पण तो कितपत यशस्वी ठरेल हे माहिती नाही. मात्र, त्याचवेळी दुखापतीमुळे गेल्या मोसमात संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर मुंबई इंडियन्समध्ये परत आला आहे. त्यामुळे टीमला थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.