नाशिक – श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरिअल नॅशनल कमिटी, नवी दिल्ली, विजय नाना स्पोर्ट्स क्लब व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन संयुक्तरीत्या आयोजित महिला “ नाशिक प्रिमियर लीग २०२२ “ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटिल यांचे शुभहस्ते व नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी चेअरमन सुचेता बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे झाले. याप्रसंगी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन विनोद शहा, सेक्रेटरी समीर रकटे, खजिनदार हेमंत देशपांडे, अॅड. प्रेरणा देशपांडे देखील उपस्थित होते. तसेच नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी , स्पर्धेची व्यवस्थापन समिति , स्पर्धेत सहभाग असलेले सहाही संघ, त्यांचे कर्णधार व प्रशिक्षक उपस्थित होते. सर्व खेळाडूंना माननीय श्री. विजयनाना नवल पाटिल व सुचेता बच्छाव यांनी मार्गदर्शनपर दोन शब्द सांगितल्यानंतर , त्यांचे हस्ते नाणेफेक करून आजच्या सकाळच्या सत्रातील दोन्ही सामन्यांचा प्रारंभ झाला. पहिल्या दिवशीच्या ४ सामन्यांत नाशिक वॉरीअर्स, नाशिक सुपर किंग्स, नाशिक ब्लास्टर्स व नाशिक फायटर्स या संघांनी एक एक विजय नोंदविले. नाशिक सुपर किंग्सच्या तेजस्विनी बाटवाल व नाशिक ब्लास्टर्सच्या साक्षी कानडी या दोन्ही कर्णधारांनी धडाकेबाज नाबाद शतके झळकवत आपल्या संघांना मोठ्या फरकाने विजयी केले.
संक्षिप्त धावफलक व निकाल :
– नाशिक वॉरीअर्स वि नाशिक चॅम्प्स – नाशिक वॉरीअर्स ३ बाद १३१ – पल्लवी बोडके ५७ वि नाशिक चॅम्प्स ७ बाद ११३ – अनन्या साळुंके ६८ . नाशिक वॉरीअर्स १८ धावांनी विजयी.
– नाशिक सुपर किंग्स वि नाशिक स्टार्स – नाशिक सुपर किंग्स २ बाद १९४ – तेजस्विनी बाटवाल नाबाद ११२ वि नाशिक स्टार्स सर्वबाद ८२ – कार्तिकी देशमुख ३ बळी . नाशिक सुपर किंग्स ११२ धावांनी विजयी.
– नाशिक ब्लास्टर्स वि नाशिक स्टार्स – नाशिक ब्लास्टर्स २ बाद १८६ – साक्षी कानडी नाबाद ११९ वि नाशिक स्टार्स ८ बाद ८२ – साक्षी कानडी ४ बळी. नाशिक ब्लास्टर्स १०४ धावांनी विजयी.
– नाशिक वॉरीअर्स वि नाशिक फायटर्स – नाशिक वॉरीअर्स ६ बाद १०८- तनिष्का चिखलीकर २ बळी वि नाशिक फायटर्स १ बाद १०९ – रसिका शिंदे नाबाद ४५ व आस्था संघवी नाबाद ३४ . नाशिक फायटर्स ९ गडी राखून विजयी.