नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वाढते शहर तसेच पाण्याचा वाढलेला वापर यामुळे धरणाच्या साठवण क्षमतेत वाढ करणे आवश्यक आहे. वर्षानुवर्ष धरणात पाण्यासोबत वाहून आलेला गाळ काढून धरणाची साठवण क्षमता तर वाढेल सोबतच तो गाळ शेतकऱ्यांना देऊन त्यांची उत्पादन क्षमता वाढेल या दृष्टिकोनातून क्रेडाई नाशिक मेट्रो महाराष्ट्र शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या उपक्रमात सहभागी होत असल्याचे प्रतिपादन क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी केले.
क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे सामाजिक जाणिवेतून गंगापूर धरणांमधील गाळ काढण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर सहाय्यक जिल्हाधिकारी जितीन रहेमान, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सागर शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. सारिका बारी, सहाय्यक गटविकास अधिकारी विनोद मेढे, क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव गौरव ठक्कर व मॅनेजिंग कमिटी सभासद नितीन पाटील हे होते.
नवीन रहिवासी इमारती चे बांधकाम करताना रहिवाशांसाठी अतिरिक्त पाण्याची गरज असते .त्याची पूर्तता करण्यासाठी नाशिक ला पाणी पुरवणाऱ्या गंगापूर धरणाची साठवण क्षमता वाढवणे आवश्यक आहे. साधारणतः ६ ब्रास ( १ ट्रक ) गाळ काढला तर सुमारे २०००० लिटर अतिरिक्त साठवण क्षमता वाढते. त्या मुळे भविष्यातील पाण्याची गरज पुरविण्यासाठी हा उपक्रम आवश्यक आणि उपयुक्त आहे
– कृणाल पाटील ,अध्यक्ष
शासनाच्या उपक्रमात सहभागी झाल्याबाबत क्रेडाई नाशिक मेट्रोचे अभिनंदन करताना सहाय्यक जिल्हाधिकारी जितीन रहेमान म्हणाले की, देशात सर्वात जास्त धरण असलेल्या राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक राज्य असून गाळामुळे धरणांची साठवण क्षमता कमी झाल्याने भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी हा उपक्रम स्तुत्य आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनीचे उत्पादन वाढावे म्हणून हा गाळ उपयुक्त असल्याचे उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांनी नमूद केले.
या उपक्रमाची संकल्पना सांगतांना क्रेडाई मॅनेजिंग कमिटीचे सदस्य व समन्वयक नितीन पाटील म्हणाले की, प्रत्येक नवीन इमारत बांधली की तेथील रहिवाशांना पाणी लागते त्यामुळे त्या वाढीव पाण्याची सोय करण्यासाठी धरणाची साठवण क्षमता वाढवण्यासाठी हा उपक्रम आहे.
हा उपक्रम 30 जून पर्यंत चालणार असून या कालावधीत सुमारे 4500 ट्रक गाळ काढून तो शेतकऱ्यांना मोफत देण्यात येणार असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव गौरव ठक्कर यांनी दिली. याप्रसंगी नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष रामेश्वर सारडा, नेमीचंद पोतदार, कोषाध्यक्ष हितेश पोतदार, सहसचिव ऋषिकेश कोते, नरेंद्र कुलकर्णी, सुशील बागड, श्याम साबळे, सागर शहा, निरंजन शहा, सभासद तसेच शेतकरी उपस्थित होते.
Credai Nashik Metro Initiative Gangapur Dam Mud