भोपाळ (मध्य प्रदेश) – देशभरातील सर्व गटातील आणि स्तरातील नागरिकांना कोरोना संसर्ग किंवा प्रादुर्भावापासून संरक्षणासाठी लस मिळावी, याकरिता केंद्र सरकार तसेच विविध राज्यांमधील शासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. अगदी घरोघरी जाऊन लशीकरणाचा उपक्रम राबविण्यात येत असताना जनप्रबोधन करण्यावर देखील भर देण्यात येत आहे. तरीही अद्याप ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये लशीकरणाविषयी गैरसमज तसेच संभ्रम कायम आहे. त्यामुळे लशीकरणाच्या अभियानाला ठिकाणी अडथळे निर्माण येत आहेत. याचा प्रत्यय नुकताच आला.
कोरोना लशीकरणाबाबत अजूनही नागरिकांमध्ये संभ्रम दिसून येत आहे, त्यामुळे लशीकरण पथकांना प्रतिकूल परिस्थितीतून जावे लागत आहे. रविवारी (दि. १४ नोव्हेंबर) श्योपूर जिल्ह्यातील एका गावात लशीकरण पथकासोबत गेलेल्या आरोग्य सहाय्यकाला ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. त्याचवेळी या घटनेचा कोणीतरी व्हिडिओ बनवून व्हायरल केला. त्यामुळे या घटनेची राज्यभरात सर्वत्र चर्चा होत आहे.
मध्य प्रदेशमध्ये भाजप प्रणित मुख्यमंत्री शिवराज सिंग चौव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सरकार कार्यरत असून या सरकारने सर्व संबंधित सरकारी विभागांना १०० टक्के कोरोना लशीकरणाचे लक्ष्य दिलेले आहे, त्याकरिता लशीकरण पथके गावागावात जाऊन लशीकरणासाठी पहिला आणि दुसरा डोस चुकलेल्यांना प्रवृत्त करत आहेत. लशीकरणाच्या कार्यक्षेत्रात आरोग्य विभागासह महिला व बालविकास विभागाचे कर्मचारी सेवा देत आहेत. मात्र तरीही त्यांना अनेक ठिकाणी प्रतिकूल वातावरणाला सामोरे जावे लागत आहे.
श्योपूर जिल्ह्यातील गडला गावात कोरोनापासून बचाव करण्यासाठी ग्रामस्थांना लशीकरण करण्यासाठी आरोग्य पथक रविवारी गेले होते. यामध्ये आरोग्य तथा रोजगार सहाय्यक माखन पटेलिया यांचाही सहभाग होता. पटेलिया हे जणांना लशीकरणाचे महत्व समजावून सांगत असताना काही ग्रामस्थ संतापले, आणि त्यांनी या सहाय्यकाला विनाकारण लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच गावातून या पथकाला हाकलून लावले. गडला गावातील या घटनेची तक्रार बारगव्हाण पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी सांगितले की, एका आदिवासी व्यक्तीसह काही जणांनी आरोग्य विभागाच्या टीम आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करीत अचानक हल्ला करण्यात आला. मात्र आता या तक्रारीची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.
https://twitter.com/Live_Hindustan/status/1459890392652869635?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1459890392652869635%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fd-32649933541499803866.ampproject.net%2F2110290545003%2Fframe.html