नवी दिल्ली/मुंबई – कोरोनाचा उद्रेक वाढत असल्यामुळे रेल्वे सेवा पुन्हा बंद होणार का, अशी शंका व्यक्त होत आहे. मात्र, अश्याप्रकारची कुठलीही योजना सध्या तरी नसल्याचे रेल्वे बोर्डाचे चेअरमन सुनीत शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.
ज्या लोकांना प्रवास करायचा आहे, त्यांच्यासाठी गाड्यांची कमतरता नाही. त्यामुळे मागणीनुसार गाड्या धावतील. गेल्या काही महिन्यांमध्ये रेल्वे स्थानकांवर प्रवाश्यांची संख्या फारशी बघायला मिळाली नाही. त्यामुळे जशी मागणी वाढत जाईल, तशी गाड्यांची संख्याही वाढत जाईल, असे सुनीत शर्मा म्हणाले. प्रवाश्यांची संख्या जास्त असल्यामुळे प्रत्येकाला आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल मागणे आम्हाला शक्य नाही, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
महाराष्ट्रातून मजुरांचे स्थलांतर सुरू झाल्याच्या बातम्या दाखविण्यात आल्या. मात्र ते स्थलांतर नसून रेल्वेचे सामान्य प्रवासी आहेत. नाईट कर्फ्यूपासून वाचण्यासाठी ते लवकर रेल्वे स्थानकावर पोहोचले आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर अचानक गर्दी बघायला मिळत आहे. याठिकाणी रेल्वे गाड्यांची संख्या कमी करण्याची अद्याप कुठलीही अधिसूचना आम्हाला मिळालेली नाही, असे सुनीत शर्मा म्हणाले.
दररोज एवढ्या विशेष गाड्या
रेल्वे मंत्रालयाने सांगितले की भारतीय रेल्वे दररोज सरासरी १ हजार ४०२ विशेष गाड्यांचे संचालन करीत आहे. ५ हजार ३८१ उपनगरीय आणि ८३० प्रवासी गाड्या सुद्धा सुरू आहेत.
लॉकडाऊनच्या भितीने स्थलांतर?
लॉकडाऊनच्या भितीने मजुरांचे स्थलांतर पुन्हा सुरू झाले आहे. मजूर आपल्या घरांच्या दिशेने निघाले आहेत. मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या गाड्यांच्या जनरल डब्ब्यांमध्ये पाय ठेवायला देखील जागा नाही. लोक एकमेकांच्या अंगावर पाय ठेवून प्रवास करीत आहेत. या गाड्या संक्रमण वाढविण्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहेत.