‘रेमडिसीवर घरी तयार होत नाही’ हे भुजबळांचे वक्तव्य दुर्दैवी अन संवेदनशून्य; दरेकरांचे टीकास्त्र

नाशिक – कोरोना रुग्णांसाठी लागणारे रेमडिसिवर इंजेक्शन मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे. यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता, रेमडिसीवर घरी तयार होत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. भुजबळांच्या वक्तव्याची गंभीर दखल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घेतली आहे. भुजबळ यांचे वक्तव्य दुर्दैवी व कर्तव्य आणि जबाबदारी झटकणारे आहे. यातून सरकारची हतबलता भुजबळांनी उद्विगवनेतून दाखवली, असा टोलाही दरेकर यांनी लगावला आहे.
दरेकर म्हणाले की, संकट काळात हतबलतेपेक्षा आधार देण्याची गरज ती दिसत नाही हेच भुजबळांच्या वक्तव्यातून दिसून येते. महाराष्ट्रात रेमडीसेविअरचा तुटवडा होत आहे. रेमडीसेवीअरवर काळाबाजार होत असून नाशिकमध्ये रेमडेसेवीअर साठी नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन केले. अशा वेळेस रेमडेसेवीअर आमच्या घरात उपलब्ध होत नाही, घरात तयार होत नाही अशा प्रकारची उद्विग्न प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. सरकार व्यवस्थेत हतबल असल्याचा हा पुरावा आहे. कर्तव्य आणि जबाबदारी पासून दूर जात असल्याचे भुजबळांचे आहे. त्याचा मी धिक्कार करतो. सरकारमधील जबाबदार मंत्र्यांनी अत्यंत संयमाने येणाऱ्या संकटाला सामोरे जायला हवे. शिवाय जनतेचा उद्रेक होत असताना त्याला सामोरं जात दिलासा देण्याची आवश्यकता होती. परंतु, असे बेफिकर वक्तव्य भुजबळ यांच्या सारख्या नेत्याला, मंत्र्याला शोभणार नाही, असे दरेकर यांनी म्हटले आहे.
अशा परिस्थितीत उद्घाटन न शोभणारे
नाशिकमध्ये कोरोनाची स्थिती अत्यंत वाईट आहे. रुग्णांना बेड मिळत नाही. आणि अशा स्थितीत पालकमंत्री भुजबळ हे उद्घाटन सोहळे करीत आहेत. २०० बेडचे ठक्कर डोम कोविड सेंटर हे उद्घाटनासाठी काही दिवस रुग्णांना उपलब्ध करुन देण्यात आले नाही, असा आरोपही दरेकर यांनी केला आहे. कोरोना संकट काळातही महाविकास आघाडीतील मंत्र्यांना उद्घाटन सोहळे कसे सूचतात, असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला आहे.