वॉशिंग्टन – अमेरिका आणि युरोपात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. चीनमध्ये सुद्धा बाधितांची संख्या वाढत आहे. महामारीचा स्फोट होऊ नये यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग प्रशासनाने अनेक प्रकारचे निर्बंध लावले आहेत. जगातील बाधितांची संख्या २५.३२ कोटींच्या वर पोहोचली आहे. महामारीमुळे ५१ लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
ऑस्ट्रिया
ऑस्ट्रिया सरकारने संसर्गाचे आकडे वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी एक अनोखे लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, ज्या नागरिकांनी कोविडविरोधी लस घेतली नाही, अशांविरुद्ध हे लॉकडाउन लावण्यात आले आहे. देशातील जवळपास ९० लाख नागरिकांना मर्यादित कारणांसाठी घरातून बाहेर पडता येईल असे ऑस्ट्रिया सरकारने प्रसिद्ध केलेल्या आदेशात म्हटले आहे. लस न घेतलेल्या नागरिकांना फक्त खरेदी, लसीकरण आणि अत्यावश्यक वस्तू आणण्याची परवानगी असेल.
चीन
वायव्य चीनच्या दालियान या शहरात बाधितांची संख्या वाढल्यानंतर झुआंगे विद्यापीठातील १५०० विद्यार्थ्यांना त्यांच्या वसतिगृहे आणि हॉटेलमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यापीठात अनेक रुग्ण समोर आल्यानंतर रविवारी हा आदेश देण्यात आला. शेकडो विद्यार्थ्यांना काही काळासाठी हॉटेलमध्ये थांबविण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. हे विद्यार्थी आता त्यांच्या खोलीतूनच ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. चीनमध्ये एका दिवसात नवे ५२ रुग्ण आढळले आहेत.
रशिया
एएनआय वृत्तसंस्थेने सिन्हुआच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, रशियामध्ये गेल्या २४ तासात कोरोनाचे ३८,४२० नवे रुग्ण आढळले आहेत. तर १,२११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रशियात बाधितांचा आकडा ९,१०९,०९४ वर पोहोचला आहे. महामारीमुळे आतापर्यंत २,५६,५९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
ब्रिटन
बाधितांचा आकडा वाढत असल्याचे पाहता ब्रिटनने कोविड विरोधी लशीच्या बुस्टर डोससाठी वयाची मर्यादा वाढविली आहे. आता ४० ते ४० वर्षाचे नागरिक आधी घेतलेल्या डोसच्या सहा महिन्यानंतर बुस्टर डोस घेण्यास पात्र असतील. यापूर्वी ५० आणि त्याहून अधिक वय असलेल्या नागरिकांना बुस्टर डोस घेण्याची परवानगी देण्यात आली होती.