मुंबई – कोरोना महामारीच्या काळात नागरिक आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करत असताना त्याच काळात भूकेने तडफडणारी २० मकाऊ माकडे आपल्या मदतीसाठी धावून आली. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. पण हो, हे खरे आहे. २० मकाऊ माकडांमुळेच भारतीयांचा जीव कोरोनापासून बचावला आहे. भारतीय आयुर्विज्ञा संशोधन परिषद (आयसीएमआर)चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी त्यांच्या ‘गोइंग व्हायरलः मेकिंग ऑफ कोव्हॅक्सिन-द इनसाइ़ स्टोरी’ या पुस्तकात हा खुलासा झाला आहे.
डॉ. भार्गव यांच्या पुस्तकात भारतातील लशीच्या संशोधनासंदर्भातच नव्हे, तर विज्ञानातील गुंतागुत आणि महामारीविरुद्धच्या संघर्षादरम्यान भारतीय वैज्ञानिकांसमोर आलेल्या आव्हानांचा उल्लेखही करण्यात आला आहे. यामध्ये प्रयोगशाळांचे बळकट जाळे विणण्यासह उपचार, सिरो सर्वे, नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि लस निर्मितीसंदर्भातील आव्हानांचा समावेश आहे.
कोरोना विषाणूशी लढण्यासाठी कोव्हॅक्सिनच्या रूपाने त्यांनी आपल्याला नव ‘संजीवनी’ दिली आहे. कोव्हॅक्सिनरूपी संजीवनी मिळविण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांसह या माकडांना खूपच अडचणींचा सामना करावा लागला. कोव्हॅक्सिनचे पहिले परीक्षण या २० माकडांवर करण्यात आले होते.
भार्गव पुस्तकात लिहितात, आम्हाला एकदा कळले की, ही लस लहान प्राण्यांमध्ये अँटिबॉडीज उत्पन्न करू शकते. तर आम्हाला पुढील महत्त्वाचे पाऊल माकडांसारख्या प्राण्यांवर परीक्षण करण्यासंदर्भात उचलायचे होते. माकडांची शारीरिक रचना आणि रोगप्रतिकारक क्षमता माणासासारखीच असते. जगभरातील वैद्यकीय संशोधनात मकाऊ जातीच्या माकडांचा वापर केला जातो.
माकडांना शोधण्याचे मोठे आव्हान
भारतात आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी (एनआयव्ही) या संशोधनासाठी एकमेव अत्याधुनिक प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांनी महत्त्वाचे संशोधन करण्याचे आव्हान स्वीकारले. माकडांना कुठून आणावे ही सर्वात मोठी अडचण होती. कारण भारतात मकाऊ जातीची माकडे आढळत नाहीत. त्यासाठी एनआयव्हीच्या संशोधकांनी पूर्ण भारतातील अनेक प्राणी संग्रहालयाशी संपर्क साधला. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असलेल्या माकडांची संशोधनासाठी गरज होती.
यशस्वी परीक्षणाचा दबाव
माकडांवर परीक्षण सुरू करण्यापूर्वी महत्त्वाच्या पायाभूत सुविधा जसे, ब्रोंकोस्कोप, एक्स रे मशीन, माकडांना ठेवण्याच्या जागेची गरज होती. पथकाला प्रशिक्षणासह प्रोटोकॉल विकसित करण्यासाठी आणि मकाऊ माकडांमध्ये ब्रोंकोस्कोपी तसेच नेक्रोप्सीची आवश्यकता होती. तेव्हा बरेच काही सुरू होते. परंतु यशस्वी परीक्षणासाठी काळजीपूर्वक ठोस योजना बनवायची होती. एनआयव्हीच्या उच्च सुरक्षा नियंत्रणात विनाअन्न आणि पाण्याशिवाय १० ते १२ तासांपर्यंत प्रयोग करणे आव्हानात्मक काम होते.
या जंगलात सापडले मकाऊ
डॉ. भार्गव सांगतात, मकाऊ माकडांच्या शोधासाठी आयसीएमआर आणि एनआयव्हीच्या पथकाने महाराष्ट्रात मोठा प्रवास केला. त्यादरम्यान लॉकडाउनमुळे शहरातील भागांत खाण्या-पिण्याच्या वस्तूंचा तुटवडा असल्याने ही माकडे घनदाट जंगलात गेली होती. महाराष्ट्रातील वन विभागाने त्यांचा शोध घेण्यासाठी अनेक किलोमीटर जंगल अक्षरशः पिंजून काढली. अथक प्रयत्नांनंतर ही माकडे नागपूरजवळ आढळली. पण आव्हान येथे संपलेले नव्हते. प्री-क्लिनिकल रिसर्चच्या आधी या माकडांना सार्स-कोव-२ अर्थात कोविडपासून वाचविण्याचे मोठे आव्हान उभे होते. त्यासाठी माकडांची देखभाल करणार्या सर्व पशू वैद्यकीय अधिकारी आणि सफाई कर्मचार्यांच्या साप्ताहिक कोविड चाचण्या करण्यात आल्या. कोविड संसर्ग होऊ नये यासाठी सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली.