मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा आता जो कोर्स (अभ्यासक्रम) आहे (उदा. मेडीकल, इंजिनिअरींग किंवा इतर कोणताही) तो अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत पूर्ण शुल्क राज्य शासन भरेल. त्यासाठी कोणताही वेगळा निर्णय करण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तारांकित प्रश्नाचे उत्तर देताना दिली. कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याच्या निर्णयाबद्दल शासनाने कोणती कार्यवाही केली. याबाबत सदस्य शिरीष चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री.पाटील बोलत होते.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतची संपूर्ण फी माफ करण्याबाबत सर्व अकृषी विद्यापीठांना निर्देश देण्यात आलेले आहेत. आतापर्यंत ९३१ पदवी अभ्यासक्रमातले विद्यार्थी, २०० पदवी अभ्यासक्रमातले विद्यार्थी आणि २२८ पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थी यांना २ कोटी ७६ लाख ८४ हजार २२२ रक्कम वितरित करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री श्री.पाटील यांनी विधानसभेत दिली.
पोषणयुक्त तांदळाचेच विद्यार्थ्यांना वाटप – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील टेंभी येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय आणि नवभारत प्राथमिक शाळेत मध्यान्ह भोजनामध्ये पोषणयुक्त तांदळाचेच वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत दिली. यवतमाळ जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये प्लास्टिकचा तांदूळ आढळून आल्यासंदर्भात विधानसभा सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना मंत्री श्री.राठोड बोलत होते.
अन्न व औषध प्रशासन मंत्री मंत्री श्री.राठोड म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आहारात पोषणयुक्त तांदूळ असावा यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पोषणयुक्त तांदळाचे वाटप राज्यात करण्यात येत आहे. या तांदळाबाबत चर्चा होत असल्याचे लक्षात आल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे आणि या तांदळाबाबत आता कोठेही गैरसमज नाही, अशी माहिती मंत्री.श्री.राठोड यांनी विधानसभेत दिली.
Covid affected Children’s State Government Announcement