नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोलिसास धावत्या दुचाकीवरून पाडणा-या तिघांना न्यायालयाने कोर्ट उठे पर्यंत व प्रत्येकी एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सचिन जगन्नाथ वाघचौरे (३६), सुरेश शकर गुनगुणे (२१ रा.दोघे विजय चौक पंचवटी) व मंगेश सुरेश जाधव (१८ रा.दत्तनगर,पंचवटी ) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. २०१४ मध्ये ही घटना गंगापूरनाका भागातील इंद्रप्रस्थ हॉल परिसरात घडली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शहर वाहतूक शाखेचे अंमलदार जी.एस.महाले व एस.जी.लोंढे हे दोघे कर्मचारी १३ जुलै २०१४ रोजी सायंकाळच्या सुमारास जुना गंगापूर नाका भागात सेवा बजावत असता ही घटना घडली होती. जहान सर्कल कडून गंगापूर नाक्याच्या दिशेने भरधाव येणा-या एमएच १५ डीके २६३० या छोटा हत्ती टेम्पोस पोलिस कर्मचा-यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने प्रमोद महाजन गार्डनच्या दिशेने आपले वाहन दामटले होते. त्यामुळे महाले यांनी आपल्या दुचाकीवर छोटा हत्तीचा पाठलाग केला असता इंद्रप्रस्थ हॉल जवळ आरोपीतांनी टेम्पोमधून धावत्या दुचाकीस लाथ मारून महाले यांना रस्त्यावर पाडले.
यावेळी त्रिकुटाने धक्काबुक्की करून त्यांना लोटून देण्यात आल्याने ते जखमी झाले होते. या घटनेत दुचाकीच्या डिक्कीचेही नुकसान झाले होते. महाले यांच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा तसेच मोटार वाहन कायदा व अन्य कलमान्वये गुन्हा दाकल करण्यात आला होता. तत्कालिन उपनिरीक्षक एस.ई. कांबळे यांनी या गुह्याचा तपास करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते.
हा खटला. जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक ९ चे न्या. एम.ए.शिंदे यांच्या कोर्टात चालला. सरकार तर्फे अॅड.आर.बी.भगडाणे यांनी काम पाहिले. न्यायालयाने सरकारी कामात अडथळा, पोलिस वाहनाचे नुकसान आदी कलमान्वये आरोपींना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व प्रत्येकी एक एक हजार रूपयांचा दंड तर मोटार वाहन कायदा कलम १८४ मध्ये तिघांना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.