नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्नीचा मानसिक व शारिरीक छळ केल्याप्रकरणी पतीस जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्ष साधा कारावासाची शिक्षा सुनावली. राकेश कैलास गायकवाड (रा.आपला महाराष्ट्र कॉलनी,हिरावाडी रोड) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा खटला अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकारी कोर्ट क्र.८ चे न्या. प्रतिभा पाटील यांच्या कोर्टात चालला.
गायकवाड यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पती राकेश गायकवाड,सासरे कैलास गायकवाड व सासू शशिकला गायकवाड यांच्या विरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २८ एप्रिल २०१५ ते सन.२०१९ या काळात आरोपीसह संशयितांनी किरकोळ कारणातून उपाशीपोटी ठेवून विवाहीतेचा मानसिक व शारिरीक छळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक उमा गवळी यांनी करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. सरकार तर्फे अॅड.जी.आर बोरसे यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार आणि पंच यांची साक्ष व तपासी अधिका-यांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून आरोपी पतीस दोन वर्ष साधा कारावास आणि दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.