नाशिक – इगतपुरी तालुक्यात झालेल्या तिहेरी खून खटल्यात आरोपी सचिन नामदेव चिमटे (२४,रा.माळवाडी) यास जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रत्येक खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेप व तीन लाखांचा दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश श्रमती एम.व्ही. भाटिया यांनी हा निकाल दिला. घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिमटे वस्ती येथे मिळकतीच्या वादातून ३० जून २०१८ रोजी ही घटना घडली होती. या घटनेत आरोपीने चुलती हिराबाई शंकर चिमटे (५५) वहिनी मंगल गणेश चिमटे (३०), पुतण्या रोहित गणेश चिमटे (४) यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. तर दुसरा पुतण्या यश गणेश चिमटे (६) याच्यावरही शस्त्राने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. सुदैवाने या हत्याकांडात यश बचावला होता. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात सचिनविरुद्ध भादंवि कलम ३०२,३०७,३२६प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. घोटी पोलीसानी परिस्थितीजन्य सबळ पुरावे गोळा करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाकडून विशेष जिल्हा सरकारी वकिल अजय मिसर यांनी एकुण १२ साक्षीदार तपासले. तसेच मिसर यांनी तांत्रिक पुरावा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या माध्यमातून भरपुर पुरावे न्यायालयापुढे सादर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत सादर करण्यात आलेले पुरावे, साक्षीदारांनी दिलेली साक्ष, पंचांची साक्षच्या अधारे आरोपी सचिन यास तीहेरी हत्याकांडासह एका प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात दोषी धरले. न्यायालयाने सचिन यास प्रत्येकी एका खुनाकरिता मरेपर्यंत जन्मठेप याप्रमाणे एकुण तीन जन्मठेपेसह ३ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.