इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लाचखोर किती माया गोळा करतात याचा प्रत्यय त्यांच्या घरी पडलेल्या छाप्यातून मिळतो. काही वेळा तर छापा मारणाऱ्या अधिकाऱ्यांचेच डोळे विस्फारतात. असाच काहीसा प्रकार आता उघडकीस आला आहे. बिहारच्या ग्रामीण बांधकाम विभागात तैनात असलेल्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या घरात नोटांचा ढीगच्या ढीग आढळून आला आहे. त्यामुळे पैसे मोजण्यासाठी चक्क काही मशिन्स मागवावे लागले आहेत. देशभरात या छाप्याची जोरदार चर्चा होत आहे.
लाचखोर इंजिनीअर संजय कुमार राय याच्या घरातून कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे. किशनगंज आणि पाटणा येथील एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर असलेल्या संजय कुमार राय याच्या ठिकाणांवर पाळत ठेवणाऱ्या पथकाने शनिवारी छापे टाकले. यावेळी घरातून सुमारे ५ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. याशिवाय दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूही मोठ्या प्रमाणात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्यापही पथकाकडून नोटांची मोजणी सुरू आहे.
मॉनिटरिंग टीमने भ्रष्ट इंजिनीअर संजय राय याच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या पाटण्यातील किशनगंज आणि दानापूर येथील दोन ठिकाणी शनिवारी छापे टाकण्यात आले. संजय राय हा किशनगंज विभागात तैनात आहेत. घरातून एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा आढळल्याचे पाहून एकदा निगराणी पथकातील अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. वसूल करण्यात आलेली रक्कम सुमारे ५ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, नेमकी किती रक्कम गवसली हे नोटांच्या मोजणीनंतरच समजेल. किशनगंज येथील संजय राय यांच्या निवासस्थानी तब्बल १४ अधिकाऱ्यांचे पथक सध्या कार्यवाही करीत आहेत.
डीएसपी अरुण पासवान यांच्या नेतृत्वाखाली हा छापा टाकण्यात आला. इंजिनीअर संजय राय याचे रोखपाल खुर्रम सुलतान आणि जवळचा इंजिनीअर ओम प्रकाश यादव यांच्याकडेही रोकड सापडली असून त्यांचीही मोजणी सुरू आहे. डीएसपी म्हणाले की, मोठ्या प्रमाणात रोकड सापडली आहे, मशीनमधून मोजणी सुरू आहे. आतापर्यंत २ कोटींहून अधिकची मोजणी झाली आहे. किशनगंज शहरातील रुईधसा आणि लाईन येथे असलेल्या भाड्याच्या घरावर पथकाने एकाच वेळी छापा टाकला. काही दिवसांपूर्वी या इंजिनीअरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
https://twitter.com/ANI/status/1563443440633135105?s=20&t=tvDgmPK9V-Z9O818Eq_z_A
Corrupted Executive Engineer Home Raid Bundle of notes Video
Bihar Sanjay kumar Rai Cash Found Bribe Corruption