नवी दिल्ली – देशभरात कोरोनाची दुसरी लाट बहुतांश ठिकाणी ओसरली असून तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. परंतु तिसरी लाट निश्चित कधी येईल, हे अद्याप सांगता येत नसले तरी येत्या दीड ते दोन महिन्याचा कालावधी म्हणजे सहा ते आठ आठवडे कसोटीचे ठरणार आहेत, असे मत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) दिल्लीचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे.
डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे की, ऑक्टोबरमधील सणांचा हंगाम पाहता नागरिकांनी पुढील सहा ते आठ आठवडे सतर्क आणि जागरूक रहावे. तसेच आपण कोरोनाच्या एकूण प्रकरणांमध्ये घट होई तोपर्यंत तरी आपल्याला खबरदारी आणि दक्षता पाळावी लागेल, असेही ते म्हणाले.
कोरोना व्हायरस विरोधी लशी संबंधित सर्व डेटा आणि संशोधन जागतिक आरोग्य संघटनेला पाठवण्यात आले आहे. या लसीचा आपत्कालीन वापर लवकरच ओळखला जाईल. आम्हाला आशा आहे की आता संशोधनाचे काम लवकरच केले गेले तर परदेश प्रवास करणे सोपे होईल. विशेषत: ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत, ते परदेशात जाऊ शकतील, असे गुलेरिया यांनी स्पष्ट केले.
आता आपण साथीच्या अवस्थेतून बाहेर पडण्यास काही प्रमाणात सुरुवात केली आहे. काही युरोपीय देशांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) कोविशील्डला मान्यता दिली. मात्र युरोपियन युनियन (ईयू) यांनी डिजिटल कोविड प्रमाणपत्र (ईयूडीसीसी) आणले असून त्यांनी अद्याप भारतासाठी व्हिसा प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली नाही.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी लस मंजूर करण्यासाठी डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञांची भेट घेतली. डब्ल्यूएचओने आतापर्यंत फायझर-बायोनटेक, अमेरिकेच्या जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना, तसेच चीनच्या सिनोफार्म आणि ऑक्सफोर्ड-एस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेल्या अँटी-कोरोना लशीच्या आणीबाणीच्या वापरास परवानगी दिली आहे.