नवी दिल्ली – केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारीचा स्फोट झाला आहे. राज्यात तीन महिन्यांनंतर प्रथमच एका दिवसात ३० हजारांहून अधिक (३१,४४५) रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी ३० मे रोजी ३०,४९१ रुग्ण आढळले होते. २१५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. केरळचे आकडे वाढल्याने संपूर्ण देशात नव्या रुग्णांची संख्या ४६ हजारावर गेली आहे. ५ ऑगस्टला ४५ हजार नवे रुग्ण आढळले होते. केरळमध्ये संसर्गाचा दर १९ टक्क्यांवर पोहोचला आहे.
ओणमनंतर रुग्ण वाढले
ज्या नमुन्यांची चाचणी होत आहे त्यापैकी प्रत्येक पाचवा व्यक्ती बाधित आढळत आहे. ओणमनंतर रुग्णसंख्या वाढण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. तो खरा सिद्ध होत आहे. त्यापूर्वी जुलैमध्ये बकरी ईद निमित्त निर्बंध शिथील करण्यात आले होते. त्यानंतर रुग्णसंख्या वाढून ती २० हजारांवर गेली होती. केरळमध्ये एका दिवसात २४ हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते. संपूर्ण देशात मृतांची संख्या कमी झाली आहे. एक दिवसापूर्वी ६४८ लोकांचा मृत्यू झाला होता. बुधवारी ६०५ लोकांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात ५ हजार नवे रुग्ण
महाराष्ट्रात बुधवारी कोरोनाचे ५,०३१ रुग्ण आढळले आहेत. राज्यात सक्रिय ५०,१८३ रुग्ण आहेत. तर महामारीमुळे आतापर्यंत १,३६,५७१ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. कर्नाटकात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १,२२४ नवे रुग्ण आढळले आहेत. तर २२ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाचे ३५ नवे रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
मध्य प्रदेशात डेल्टाचे दोन रुग्ण
एएनआयच्या वृत्तानुसार मध्य प्रदेशमध्ये प्रथमच डेल्टा व्हेरिएंटचे दोन रुग्ण आढळले आहेत. या लोकांना तीन जुलैला इंदूरमध्ये कोविडची लागण झाली होती. कोविड व्यवस्थापनाचे नोडल अधिकारी डॉ. अमित मालाकार सांगतात, दोन्ही रुग्णांना कोविड विरोधी लस देण्यात आली होती.
देशातील कोरोनाची स्थिती
– २४ तासात ४६,२२७ नवे रुग्ण
– ३,२७६८४ एकूण सक्रिय रुग्ण
– २४ तासात ७९.४३ लाख जणांचे लसीकरण
– एकूण ६०.२८ कोटी लोकांचे लसीकरण
– ३,२५,५७,७२९ एकूण रुग्ण
– २४ तासात ६०५ मृत्यू
– ४,३६,३९६ जणांचे एकूण मृत्यू
– बरे होण्याचा दर ९७.६७ टक्के
– मृत्यू दर १.३४ टक्के
– पॉझिव्हिटी दर २.१० टक्के
– पॉझिटिव्हीटी दर १.९२ टक्के
– मंगळवारी १७,९२,७५५ जणांची तपासणी
– मंगळवारी एकूण तपासण्या ५१,११,८४,५४७
(कोविड-१९ इंडिया.ओआरजीकडून आकडेवारी)
कोणत्या राज्यात किती लसीकरण
मध्य प्रदेश – २३.४३ लाख
उत्तर प्रदेश – ८.१९ लाख
बिहार – ६.३८ लाख
राजस्थान – ४.९५ लाख
महाराष्ट्र – ३.९२ लाख
गुजरात – ३.२६ लाख
झारखंड – १.४० लाख
दिल्ली – ०.९८ लाख
पंजाप – ०.९४ लाख
हरियाणा – ०.८६ लाख
उत्तराखंड – ०.६६ लाख
हिमाचल प्रदेश – ०.५६ लाख
(कोविन अॅपवरून आकडेवारी)
तिसरी लाट कमी धोकादायक
दिल्लीमधील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, की देशभरात गोळा करण्यात आलेल्या सिरो सर्व्हेची आकडेवारी पाहता तिसरी लाट कमी धोकादायक असू शकते. लसीकरण होत असल्यामुळे तिसरी लाट कमी धोकादायक असेल. दुसर्या लाटेदरम्यान अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंटमुळे प्रतिदिन चाल लाखांहून अधिक रुग्ण आढळले होते. तिसर्या लाटेत इतके रुग्ण वाढणार नाहीत, असे ते म्हणाले.
६० कोटीवर लोकांचे लसीकरण
कोविन प्लॅटफॉर्मवर रात्री १२ वाजेपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार भारतात कोरोनाचे आतापर्यंत ६०.२८ कोटी डोस देण्यात आले आहेत. यामध्ये ४६.७१ कोटी पहिल्या आणि १३.५७ कोटी लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. बुधवारी ७९.४३ लाख डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तयारींना वेग आला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, लसीकरणाबाबत राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समुहाची लवकरच बैठक होणार आहे. यामध्ये लसीकरण मोहिमेत जायडस कॅडिला ही लशीला मान्यता देण्याचा निर्णय होऊ शकतो. लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भातही बैठकीत आराखडा तयार केला जाऊ शकतो.