अहमदनगर – राज्यभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच नगर जिल्ह्यातून चिंताजनक वृत्त आहे. नगर जिल्ह्यातील अनेक गावात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात दररोज ५०० ते ८०० दरम्यान नवे कोरोना बाधित आढळून येत आहेत. परिणामी, जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट हा पाच टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर निर्णय घेतला आहे. दहाहून अधिक सक्रीय कोरोना बाधित रुग्ण असलेल्या गावांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) जाहिर करण्यात आले आहे.
नगर जिल्ह्यातील ११ तालुक्यातील ६० गावांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याठिकाणी केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी असणार आहे. ४ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर दरम्यान हा लॉकडाऊन लागू असेल असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे. संगमनेर तालुक्यातील तब्बल २४, श्रीगोंदा तालुक्यातील ९, राहाता तालुक्यातील ७ तर पारनेर तालुक्यातील ६ गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यातील गावांचा लॉकडाऊनमध्ये समावेश आहे. या गावांमध्ये ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या गावात येण्यास किंवा गावातून बाहेर जाण्यासही मनाई करण्यात आली आहे. कृषी माल व आवश्यक वस्तू वाहतुकीस परवानगी देण्यात आली असली तरी अन्य वाहनांना प्रतिबंध घालण्यात आला आहे.
या गावात उद्यापासून लॉकडाऊन (तालुका आणि गावे)
अकोले – लिंगदेव, वीरगाव, परखतपूर. कर्जत – खांडवी, बाभूळगाव दुमाला. कोपरगाव – गोधेगाव.
नेवासा – कुकाणा
पारनेर – वडनेर बु., कान्हुरपठार, गोरेगाव, दैठणेगुंजाळ, जामगाव, भाळवणी
पाथर्डी – तिसगाव
राहाता – भगवतीपूर, पिंप्री निर्मळ, अस्तगाव, कोर्हाळे, लोणी बु., लोणी खु., कोल्हार बु
संगमनेर – गुंजाळवाडी, शेडगाव, निमगाव जाळी, आश्वी बु., आश्वी खु., पारेगाव बु., पानोडी, शिबलापूर, बोटा, उंबरी, पिंपरणे, वेल्हाळे, खळी, देवगाव, घुलेवाडी, वडगाव लांडगा, तळेगाव, घारगाव, चंदनापुरी, कनोली, निमोण, वडगावपान, सायखिंडी
शेवगाव – भातकुडगाव, घोटण, दहिगावने, आव्हाण बु
श्रीगोंदा – लोणी व्यंकनाथ, घारगाव, बेलवंडी, मढेवडगाव, शेडगाव, येळपणे, कौठा, कोळगाव, काष्टी. श्रीरामपूर- बेलापूर खु., उक्कलगाव, कारेगाव.