इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जवळपास तीन वर्षे उलटून गेली तरी जग कोरोनाच्या सावटातून पूर्णपणे मुक्त झालेले नाही. आता एका नव्या अहवालाने चिंतेत भर टाकली आहे. खरं तर, एका आरोग्य विश्लेषक फर्मने आपल्या अहवालात दावा केला आहे की, पुढील दशकात कोरोनासारखी आणखी एक धोकादायक महामारी जगावर येण्याची २७.५ टक्के शक्यता आहे. मात्र, वेळेवर लस तयार करून साथीच्या आजाराचा धोका कमी करता येऊ शकतो, असेही अहवालात म्हटले आहे.
लंडनची एअरफिनिटी लि. फर्मचा दावा आहे की हवामान बदल, वाढता आंतरराष्ट्रीय प्रवास, वाढती लोकसंख्या आणि प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणारे रोग यामुळे साथीचे रोग होण्याची शक्यता आहे. तथापि, कंपनीने असेही म्हटले आहे की, जर नवीन संसर्गजन्य रोग आढळल्यानंतर १०० दिवसांच्या आत त्याची लस तयार केली गेली तर महामारीचा धोका ८ टक्क्यांपर्यंत कमी होईल.
कंपनीचे म्हणणे आहे की, जर परिस्थिती आणखी बिघडली आणि नियंत्रणाबाहेर गेली तर बर्ड फ्लूसारख्या विषाणूच्या संसर्गामुळे एकट्या ब्रिटनमध्ये दररोज १५ हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो. गेल्या दोन दशकांत, जगाने तीन मोठ्या महामारी पाहिल्या आहेत, ज्यात कोरोना महामारी, SARS, MERS आणि स्वाइन फ्लू सारख्या साथीचा समावेश आहे.
H5N1 बर्ड फ्लू संसर्ग देखील चिंता वाढवत आहे. जरी याची लागण झालेल्या लोकांची संख्या कमी असली आणि माणसाकडून माणसात पसरण्याची चिन्हे नाहीत. पक्षी आणि सस्तन प्राण्यांमध्ये पसरण्याचा वेग वेगवान असला तरी त्यामुळे चिंता कायम आहे. झिका, मर्स इत्यादी अनेक घातक आजारांची लसही अद्याप सापडलेली नाही. अशा स्थितीत आरोग्य शास्त्रज्ञांना तत्काळ अशी पावले उचलावी लागतील, जेणेकरून भविष्यातील साथीच्या आजारांना तोंड देता येईल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Corona Like Pandemic London Health Firm Report