नवी दिल्ली – दक्षिण अफिक्रा आणि बोत्सवाना येथे कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक धोकादायक रूप आढळले आहे. या व्हेरिएंटचा फैलाव अधिक वेगाने होऊ शकतो. बोत्सवानामध्ये आढळलेला हा व्हेरिएंट आतापर्यंतचा विषाणूचा सर्वात उत्परिवर्तित (म्युटेटेड) रूप आहे. बी. १.१.५२९ व्हेरिएंटचे नाव न्यू असे ठेवले जाण्याची शक्यता आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकार्यांनी गुरुवारी या नव्या कोरोना व्हेरिएंटवर चर्चा करण्यासाठी भेट घेतली. या व्हेरिएंटने बाधित झालेले २६ रुग्ण आढळले आहेत. या व्हेरिएंटचा बोत्सवाना (३), दक्षिण अफ्रिका (२२) आणि हाँगकाँग (१) मध्ये फैलाव झाला आहे. या व्हेरिएंटमध्ये आतापर्यंत ३२ म्युटेशन निदर्शनास आले आहेत. त्यामुळे तो अत्याधिक संक्रामक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या व्हेरिएंटवर लशीचा परिणाम होत नसल्याचे बोलले जात आहे. याच्या स्पाइक प्रोटिनमध्ये कोणत्याही व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक परिवर्तन पाहायला मिळाले आहे.
दक्षिण अफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसिस (एनआयसीडी) या राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संस्थेने बी. १.१.५२९ हा व्हेरिएंटला दुजोरा दिला आहे. जिनोम सिक्वेन्सिंग केल्यानंतर २२ रुग्ण आढळल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. एनआयसीडीचे कार्यवाहक कार्यकारी संचालक प्राध्यापक अँड्रियन प्युरेन म्हणाले, दक्षिण अफ्रिकेत कोरोनाचा नवा अवतार आढळला, परंतु यामध्ये आश्चर्यकारक काहीच नाही. सध्या कमी रुग्ण आढळले आहेत. आमचे तज्ज्ञ नव्या अवतारावर संशोधन करण्यासाठी सर्व यंत्रणांसोबत काम करत आहेत.
युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधील अनुवांशिकतज्ज्ञ प्रा. फ्रेंकोइस बलॉक्स सांगतात, हा व्हेरिएंट कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या रुग्णामध्ये अनेक दिवस वाढला आहे. संबंधित रुग्णाला एड्सही असू शकतो. व्हेरिएंटमधील स्पाइकमध्ये होत असलेल्या बदलामुळे लसीकरणाचा या व्हेरिएंटवर परिणाम होणार नाही. कारण कोरोनाच्या जुन्या व्हेरिएंटशी लढण्यासाठी या लशीची निर्मिती झाली आहे.
इंपिरिअल कॉलेजचे व्हायरोलॉजिस्ट डॉ. टॉम पिकॉक सांगतात, व्हेरिएंटच्या म्युटेशनचे संयोजन खूपच धोकादायक आहे. बी.१.१.५२९ व्हेरिएंट आतापर्यंत आढळलेल्या सर्व व्हेरिएंटच्या तुलनेत सर्वात धोकादायक असू शकतो. हा व्हेरिएंट डेल्टा पेक्षाही अधिक संक्रामक आहे. जास्त संख्येत होणारे म्युटेशन त्याला कमजोर करू शकते. त्याची हीच नकारात्मक बाब त्याला अस्थिर बनवू शकते. परिणामी या व्हेरिएंटचा फैलाव रोखण्यास मदत मिळू शकते. या व्हेरिएंटचा वेगाने फैलाव होत असल्याचे अद्याप निदर्शनास आलेले नाही. त्यामुळे सध्या जास्त चिंतीत होण्याची गरज नाही.
अफ्रिकेत आढळलेल्या या व्हेरिएंटबद्दल भारतातही इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहून परदेशातून येणार्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्रामध्ये म्हटले की, या व्हेरिएंटमध्ये अधिक प्रमाणात म्युटेशन होण्याची माहिती मिळाली आहे. जोखीम असलेल्या देशातून भारतात प्रवास करणार्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तसेच त्यांची तपासणी करणे आवश्यक आहे.