कोलकाता (पश्चिम बंगाल) – कोणताही नेता हा जनतेचा प्रतिनिधी म्हणजेच लोकप्रतिनिधी असतो. त्यामुळे सहाजिकच त्याने कोणत्याही गोष्टीबद्दल विधान करताना विचारपूर्वकच बोलायला हवे, असा संकेत आहे. परंतु अलीकडच्या काळात काही लोकप्रतिनिधी आपल्या मनाला येईल ते बोलत असल्याने त्यांचे वक्तव्य वादग्रस्त ठरते. त्यातून मग वादविवाद किंवा वादंग निर्माण होते, अशीच घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे.
केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी नोबेल पारितोषिक विजेते, प्रसिद्ध कवी रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून वादाला तोंड फोडले आहे. सुभाष सरकार हे झारखंडमधील भाजपचे राज्य प्रभारी आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. बुधवारी पश्चिम बंगालच्या विश्व भारती विद्यापीठातील एका कार्यक्रमात ते म्हणाले की, रवींद्रनाथ टागोर काळ्या रंगाचे असल्यामुळे त्यांच्या दत्तक आईने त्यांना कडेवर घेण्यास नकार दिला होता. टागोर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या तुलनेत काळे होते, तर इतर सदस्य रंगाने गोरे होते, त्यामुळे टागोरांच्या आईने आणि इतरांनी त्यांना दत्तक घेण्यास नकार दिला होता. तसेच त्याच्या आईने त्याकाळात ‘त्या’ बाळाला तेव्हा कडेवर घेतले नाही, तरीही त्याच बालकाने पुढे भारताचे नाव जगात उज्ज्वल केले.
दरम्यान, टीएमसीचे ज्येष्ठ नेते अनुब्रत मंडळ यांनी या मुद्यावर सांगितले की, केंद्रीय मंत्री सुभाष यांना रवींद्रनाथ टागोरांबद्दल काहीच माहिती नाही आणि म्हणूनच ते त्यांची बदनामी करत आहेत. सुभाष सरकारला असे कसे बोलत आहेत ? त्याचा जन्म टागोरांच्या आधी झाला होता का? असा सवाल मंडळ यांनी उपस्थित केला आहे. वास्तविक स्वातंत्र्यपूर्व काळात रवींद्रनाथ टागोर हे प्रसिद्ध बंगाली लेखक आणि नोबेल पारितोषिक विजेते होते. तसेच ते विश्व भारती विद्यापीठाचे संस्थापकही होते.