विशेष प्रतिनिधी, मुंबई
आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. पक्षाची शक्तिस्थळांपैकी एक असलेल्या इंटकला मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.
पटोले यांच्या समवेत राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक महाराष्ट्र शाखेच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच ऑनलाईन झाली. यावेळी पटोले म्हणाले की, केंद्र सरकारने कामगार कायदे मोडीत काढीत मालक धार्जिणे कोड बनवून कामगार देशोधडीला लावण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. कामगार विरोधी कायदे महाराष्ट्र राज्यात लागू होऊ देणार नाही. कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्य काळापासून इंटक सूचनेवरून अनेक कामगार हिताचे कायदे बनविले. परंतु सध्या शेतकरी कामगारांच्या विरोधात केंद्र सरकार कायदे करीत आहे. या विरोधात काँग्रेसचे लढा देण्याचे काम करीत असून काँग्रेस हा पक्ष नसून विचारधारा असल्याचेही पटोले म्हणाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या समस्या, कामगारांची होणारी हालअपेष्टा, सरकारचे धोरण, काँग्रेस पक्षाकडून इंटकला मिळणारी वागणूक तसेच शासनाच्या विविध मंडळ, महामंडळावर इंटकला प्रतिनिधित्व मिळावे यासह विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे काँग्रेस पक्ष व इंटक संघटनेमध्ये समन्वय वाढून संबंध मजबूत करण्यासाठी बैठक घेण्याची विनंती प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी पटोले यांच्याकडे केली होती. त्यानुसार ही बैठक झाली.

			








