नवी दिल्ली – काँग्रेस पक्षामध्ये सध्या नक्की काय सुरू आहे, असा प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडला आहे. पंजाब असो की विविध राज्यात अनेक ठिकाणी पक्षांतर्गत कलह गाजत आहे. आता आसाम काँग्रेसमधील एक बाब समोर आली आहे. आपलाच आमदार हा खुद्द भाजपचा एजंट असल्याची तक्रार खुद्द काँग्रेस पक्षाने केली आहे. पक्षाच्या धोरणांविरुद्ध वक्तव्य केल्यामुळे या आमदाराला प्रदेश काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या आमदाराने सांप्रदायिक सद्भावाला तडा लावणारे वक्तव्य केल्याचाही आरोप लावण्यात आला आहे.
शर्मन अली अहमद असे या काँग्रेस आमदाराचे नाव आहे. त्यांना दिलेल्या नोटिशीत म्हटले आहे की, तुम्ही काँग्रेसचे सदस्य असतानाही भाजपचा एजंट असल्यासारखे काम करत आहात. मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्याशी जवळीक असल्यामुळे तुम्हाला निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे नुकसान करण्यासाठी प्रायोजित करण्यात आले आहे.
एक आमदार म्हणून तुम्ही माध्यमांमध्ये केलेल्या सांप्रदायिक आणि प्रक्षोभक वक्तव्यामुळे मागील आसाम आंदोलनाच्या जखमांवरील खपली पुन्हा निघाली आहे. सर्व समाजाच्या नागरिकांबाबत तुम्ही केलेले वक्तव्य पूर्णपणे असंवेदनशील आणि अनावश्यक आहे. पोटनिवडणुकीपूर्वी तुम्ही केलेले वक्तव्य राजकीय हेतूने प्रेरित असून, त्यामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाल्याचे मानण्यात आले आहे. नोटीस मिळाल्याच्या तीन दिवसांच्या आत आसाम काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना आपले उत्तर पाठवावे असे निर्देश दिले जात आहेत.
काय केले वक्तव्य
शर्मन अली अहमद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, १९८३ मध्ये आसाम आंदोलनादरम्यान धौलपूर परिसरात संशयित बांगलादेशी नागरिकांनी मारलेले आठ नागरिक शहीद नसून खूनी होते. त्यांनी (माजी मंत्र्यांच्या भावासह आठ नागरिक) आसाम आंदोलनाच्या नावावर अनेक नागरिकांचा खून केला होता. ग्रामस्थ त्यांना घाबरत होते त्यामुळे स्वसंरक्षणार्थ ते त्यांना ठार मारत होते. त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनांनी त्यांच्यावर टीका करून विनाअट माफी मागावी अशी मागणी केली आहे.