नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतची परिस्थिती आता स्पष्ट झाली आहे. ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी पक्षाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. आज दुपारी काँग्रेस कार्यालयात पोहोचल्यानंतर त्यांनी अर्ज दाखल केला. त्याचवेळी झारखंड काँग्रेसचे नेते के एन त्रिपाठी यांनीही पक्षाध्यक्षपदासाठी फॉर्म भरला आहे. उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचा आदर केला जाईल, असे सांगितले आहे. तर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता या तिघांपैकीच एक जण अध्यक्ष होणार आहे.
खर्गे यापूर्वी ते म्हणाले होते की मी (काँग्रेस अध्यक्षपदासाठी) उमेदवारी दाखल करणार आहे. त्यानंतर मी येऊन बोलेन. त्याचवेळी काँग्रेसचे खासदार दीपेंद्र सिंग हुड्डा म्हणाले की, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. आम्हाला आशा आहे की त्यांची निवड होईल. हरियाणातून (भूपिंदर सिंग) हुडा आणि मी त्यांच्या नामनिर्देशनपत्रावर प्रस्तावक म्हणून स्वाक्षरी केली आहे.
दिग्विजय सिंहांची माघार
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी आज पक्षप्रमुखपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नसून, त्यांचे सहकारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उमेदवारीमध्ये ते प्रस्तावक असतील. आयुष्यभर मी काँग्रेससाठी काम केले आहे आणि यापुढेही करत राहीन, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गेहलोतही बाहेर
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. यानंतर दिग्विजय सिंह यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत नामनिर्देशनपत्रांचे १० ‘सेट’ घेतले. काँग्रेसच्या ‘एक व्यक्ती, एक पद’ या नियमांतर्गत निवडणूक लढवण्यासाठी गेहलोत यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते.
१७ ऑक्टोबरला मतदान
नवी दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) मुख्यालयाच्या आवारात एक तंबू उभारण्यात आला आहे. जिथे पक्षाचे नेते दुपारी ११ ते ३ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १७ ऑक्टोबरला मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.
Congress President Election Nomination Final Picture