नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान व अदानी यांच्यातील संबंधांवरून अनेक गंभीर आरोप केला होते. त्यावरून लोकसभा सचिवालयाने आता त्यांना हक्कभंगाची नोटीस पाठविली आहे. तुम्ही केलेल्या आरोपांचे पुरावे द्या, अथवा माफी मागा, असा इशारा त्यांना देण्यात आला आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी अदानी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केले होते. राहुल गांधींचे हे आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांना पुरावे सादर करण्यास सांगून देखील ते देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे यावेळी राहुल गांधींवर कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिला आहे. राहुल गांधींना लोकसभेचे सदस्यत्व गमवावे लागेल, असा दावा भाजपकडून केला जात आहे.
जोशी, दुबे यांची तक्रार
राहुल गांधी यांच्या भाषणानंतर प्रल्हाद जोशी व खासदार निशिकांत दुबे यांनी सचिवालयाकडे तक्रार दिली होती. राहुल गांधींनी हक्कभंग केला असून संसदेचा अवमान केला असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे, असे भाजपचे खासदार निशिकांत दुबे म्हणाले. यात गांधी यांचे सदस्यत्वही रद्द होऊ शकते, असा दावा दुबे यांनी केला. दुसरीकडे लोकसभेत राहुल गांधी यांनी जाहीर माहितीच्या आधारे विधाने केली असल्याचा प्रतिवाद राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. दरम्यान, लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. त्यांनी केलेली विधाने दिशाभूल करणारी, अपमानास्पद, असभ्य, असंसदीय आणि सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गांधी यांना १५ फेब्रुवारीपर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे.
राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले प्रश्न
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात आरोप करतानाचा अनेक प्रश्नही उपस्थित केले होते. गेल्या आठ वर्षांमध्ये अदानी समूहाची इतकी भरभराट कशी झाली? मोदी- अदानीत नाते काय? दोघेही परदेश दौऱ्यावर एकत्र किती वेळा गेले? मोदींचा दौरा झाल्यानंतर तात्काळ अदानींनी किती परदेश दौरे केले? अदानींनी २० वर्षांमध्ये मोदींना व भाजपला किती पैसे दिले?, आदी प्रश्नांचा भडीमार करीत त्यांनी पंतप्रधनांवर निशाणा साधला होता.
Congress MP Rahul Gandhi Parliament Rule Violation Notice