नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. बलात्कार हे राजकीय विरोधात वापरण्याचे शस्त्र आहे, असे विधान शिवानी यांनी केले आहे.
शिवानी या विजय वडेट्टीवारांच्या कन्या असून त्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव आहेत. त्यांनी एका कार्यक्रमात हे वादग्रस्त विधान केले असून त्याचा व्हिडियो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सावरकरांचे हे विचार त्यांनी स्वतःच त्यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात मांडले आहेत, असा दावा शिवानी यांनी वडिलांच्या मार्फत केला आहे. विधानाचा पुरावा नसेल तर मीफ मागण्याची सूचना आपण कन्येला दिली होती, पण तिने पुस्तकाचा दाखला दिल्यामुळे ती माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
सावरकरांच्या या विचारांमुळे महिलांना भीती वाटत असल्याचेही शिवानी यांनी या कार्यक्रमात म्हटले आहे. सत्ताधाऱ्यांच्या सावरकर गौरव यात्रेच्या पार्श्वभूमीवर शिवानी यांनी केलेले विधान जास्तच व्हायरल होत आहे. यात सावरकरवादी आणि सत्ताधारी दोन्हींकडून जोरदार निषेध केला जात आहे. काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही महाविकास आघाडीचा घटक आहेत. अश्यात काँग्रेस नेत्या शिवानी यांच्या विधानावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
काय म्हणाल्या शिवानी?
‘बलात्कार हे राजकीय शस्त्र आहे. हे शस्त्र राजकीय विरोधात वापरायला हवे, असे सावरकरांचे विचार होते. या विचारांशी प्रामाणिक असलेल्या लोकांपासून माझ्यासारख्या आणि येथे असलेल्या महिलांनी स्वतःला सुरक्षित कसे समजावे?’ असा सवाल करून अश्या लोकांची यात्रा काढली जाते हे दुर्दैव आहे, अशी टिका शिवानी वडेट्टीवार यांनी कार्यक्रमात केली. या भाषणादरम्यान शिवानी अत्यंत आक्रमक दिसत आहेत.
https://twitter.com/SVW790/status/1646867203327946756?s=20
तर्कहीन विधान
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर्कहीन विधान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ‘काही लोकांना इतिहास माहिती नाही आणि वर्तमानही माहिती नाही. हे लोक विचार न करता काहीही बोलतात. अशा लोकांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया द्यायची. एखाद्याने तर्कहीन विधान केलं तर त्यावर काय बोलणार?’ अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
https://twitter.com/SVW790/status/1646513167131107331?s=20
Congress Leader Shivani Wadettiwar Statement on Savarkar