पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदावरून राजिनामा देतानाच्या घडामोडींवरून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरू आहे. वादाची धग दुसऱ्या फळीतील नेत्यांपर्यंतही पोहोचली आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी कोण रोहित पवार असा प्रश्न उपस्थित करीत त्यांच्यात पोरकटपणा असल्याची टीका केली होती. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्या माझ्या मोठ्या भगिनी असून त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे ते म्हणाले.
रोहित पवार यांनी सोलापूर लोकसभेच्या जागेवर दावा सांगितला होता. त्याबाबत विचारणा केली असता प्रणिती शिंदे म्हणाल्या की, ते पहिल्यांदाच आमदार झाले आहेत, त्यामुळे त्यांच्यात अजूनही तो पोरकटपणा आहे. या परखड प्रतिक्रियेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्याचवेळी रोहित पवार यांनी ट्वीट करीत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
रोहित पवारांचे ट्विट
आमदार प्रणिती शिंदे ताईंच्या वक्तव्यावरून नाराज झालेले कार्यकर्ते आपला राग व्यक्त करत आहेत. पण, कुणीही नाराज होऊ नये. त्या माझ्या मोठ्या भगिनी असून त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. आपापसात वाद न करता बेरोजगारी हा आजचा मुख्य प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपली शक्ती खर्च करूया, अशी संयमी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे.
https://twitter.com/RRPSpeaks/status/1624079921231564801?s=20&t=6-U8joNzZm5N3co4Jx2FPw
प्रणिती शिंदे काय म्हणाल्या होत्या?
सोलापूर लोकसभेच्या जागेसंदर्भात विधान करणारे आमदार रोहित पवार कोण? असा प्रतिसवाल काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा, आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. रोहित पवार हे पहिल्यांदाच आमदार झाल्यामुळे कदाचित अजून त्यांच्यात पोरकटपणा असेल, त्यांना आणखी थोडा वेळ दिला जावा, असे त्या म्हणाल्या होत्या.
काय म्हणाले होते रोहित पवार?
सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांना सलग दोनवेळा पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूरची राखीव जागा काँग्रेसने स्वतः न लढविता राष्ट्रवादीला द्यावी, अशी मागणी या पक्षाच्या स्थानिक पातळीवर होत असल्याचे सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे या जागेवर राष्ट्रवादीचा दावा सांगितला.
https://twitter.com/RRPSpeaks/status/1624083448242774017?s=20&t=6-U8joNzZm5N3co4Jx2FPw
Congress Leader Praniti Shinde NCP MLA Rohit Pawar Critic