विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशातील सर्वात जुना आणि मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसमधील अंतर्गत कलह संपण्याचे नाव घेत नाहीये. उत्तरेतील पंजाबपासून दक्षिणेत केरळपर्यंत आणि पूर्वेतील आसामपासून ते पश्चिमेतील गुजरातपर्यंत जवळपास सहा राज्यांमध्ये अंतर्गत गटबाजीने काँग्रेसला पोखरले आहे. आगामी निवडणुकांसाठी सज्ज होण्याऐवजी बुडत्याचा पाय खोलात या म्हणीप्रमाणे काँग्रेसचा पाय आणखी खोलात रूतत आहे. याचा फायदा सहाजिकच भाजपला होत असून अनेक नेते कंटाळून भाजपवासी होत आहेत.
पंजाब – कॅप्टन विरुद्ध सिद्धू
पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील कलह पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचला आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांना कोणतेही महत्त्वाचे पद देणार नाही, असे अमरिंदर सिंग यांनी पक्षश्रेष्ठींना स्पष्ट केले आहे. पंजाबमधील कलह सोडविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तीन सदस्यीय समितीसमोर मुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. सिद्धू यांना उपमुख्यमंत्रीपद किंवा प्रदेशाध्यक्षपद देणार नाही, असे त्यांनी समितीच्या सदस्यांना सांगितले. गांधी कुटुंब सिद्धू यांच्या बाजूने असल्याचे बोलले जात आहे. परंतु कॅप्टन आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. ते पुन्हा एकदा आज समिती सदस्यांची भेट घेणार आहेत.
राजस्थान – रस्सीखेच
राजस्थान काँग्रेसमधील कलह गेल्या वर्षीच समोर आला होता. तेव्हा पक्षश्रेष्ठींना हस्तक्षेप करून सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांची मनधरणी करावी लागली होती. दोघांमधील वाद पुन्हा एकदा वाढला आहे. मुख्यमंत्री गेहलोत पायलट यांच्या गोटातील आमदारांना मंत्रिपद देत नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे नाराज पायलट यांनी गेल्या १५ दिवसात दोनदा दिल्ली दौरा केला आहे. परंतु गांधी कुटुंबीयांसोबत त्यांची अद्याप भेट झालेली नाही.
केरळ – अंतर्गत वाद
केरळ विधानसभा निवडणूक निकालात पराभवानंतर काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष ए. रामचंद्रन यांना पदावरून हटविले होते. त्याशिवाय विरोधी पक्षनेता म्हणून रमेश चेन्निथला यांनाही हटविण्यात आले. चन्निथला यांच्या गोटातील नेत्यांनुसार, त्यांना पदावरून हटविणे समजू शकतो. पण त्यांना सन्मानकारक निरोप दिला गेला नाही. चेन्निथला यांनी गेल्या शुक्रवारी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. सोनिया गांधी यांनाही पत्र लिहिले आहे.
आसाम – अनेक नेते भाजपमध्ये
विधानसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेल पक्षाला आपल्याच लोकांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. आसाममध्ये काँग्रेसकडून चार वेळा आमदार राहिलेलेल रूपज्योती कुर्मी यांनी राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस नेतृत्व स्थानिक नेत्यांचे ऐकण्याऐवजी दिल्लीमध्ये बसलेल्या नेत्यांचे म्हणणे ऐकत आहेत, असा आरोप त्यांनी केला. रुपज्योती यांच्याशिवाय अनेक नेते भाजपवासी होऊ शकतात असे मानले जात आहे.
झारखंड – अडचणी वाढल्या
झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) यांच्या आघाडी सरकारमध्ये सर्वकाही व्यवस्थित सुरू आहे, असे म्हणता येणार नाही. मुख्यमंत्री आणि जेएमएम नेते हेमंत सोरेन दिल्लीत पाच दिवस राहून पुन्हा रांचीला पोहोचले आहेत. मुख्यमंत्री आपल्या खासगी दौर्यासाठी दिल्लीत आले होते, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. तर राज्यात काँग्रेसला टाळून मुख्यमंत्री सोरेन महत्त्वाचे निर्णय घेत असल्याने काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी नाराज आहेत, अशा बातम्या रांची येथून येत आहेत.
गुजरात – हार्दिक पटेल नाराज
अनेक बातम्यांमध्ये दावा करण्यात आला आहे की, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल काँग्रेसशी नाराज असून, दुसर्या पक्षात जाण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टीत जाण्याच्या शक्यता हार्दिक यांनी फेटाळून लावल्या आहेत. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास दोन वर्षे राहिली आहेत. परंतु येथे काँग्रेसला अद्याप नेतृत्व मिळू शकले नाही. राजीव सातव यांच्या निधनानंतर येथे कोणीही प्रभारी नाहीत. प्रदेशाध्यक्षपदही रिक्तच आहे.