इंडिया दर्पण विशेष – वृक्षवल्ली आम्हां सोयरी
चला, निसर्गाची रंग उधळण बघूया
निसर्गाला जवळून बघण्याची व त्यातील घटकांची ओळखण्याची हीच खरी वेळ आहे. हिवाळा संपता संपता, बरेच वृक्ष वेलींना फुलोरा येण्यास सुरुवात होते. काही वृक्षांची पानगळ होते. पानगळी नंतर फुले येण्यास सुरुवात होते. जणू काही कोण किती सुंदर ह्या निसर्गामध्ये रंगाची उधळण करतो, अशी त्यांच्यामध्ये स्पर्धाच लागलेली असते.
कुठल्या झाडाच्या फुलावर कुठल्या प्रकारचे पक्षी येतात. याचा अभ्यास करण्याची आणि त्या झाडाची ओळख करून घ्यायची तर ही खरी संधी ह्या चार-पाच महिन्यात असते. हा जो फुलोरा आणि फळ येण्याचा कालावधी आहे, तो साधारणतः जून पर्यंत बऱ्याचशा झाडांना या काळामध्ये फुले व फळांनी बहरलेला आणि रंगांची उधळण बघण्यास खरा आनंद मिळतो. थोडक्यात या दिवसात फुलणाऱ्या झाडांविषयी पळस, काटेसावर,पांगारा, या झाडांवर मध खाण्यासाठी पक्ष्यांची लगबग बघण्यात, वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबिरंगी पक्षी आपल्याला दिसून येतात. त्यांचा किलबिलाट ऐकण्यात एक वेगळीच मजा असते.
काही फुलांवर येणाऱ्या कीटकांना भक्ष्य करण्यात मग्न असतात. सोन सावर आपल्या पिवळ्या धमक फुलांची एक वेगळेच सौंदर्य दाखवून मन मोहून टाकतो. जंगली बदाम याचे एकीकडे गर्द लाल रंगाच्या पाच ते सहा इंचाचा काजूच्या आकाराचे उकलण्याच्या स्थितीत फळांमधून काळ्याशार गोलसर बियांणा बाहेर उड्या मारण्याची घाई असल्याचाच भास होतो. त्याबरोबरीने नवीन फुलोरा मातकट गुलाबी रंगाचा एक आगळावेगळा निसर्गाचा आविष्कार वाटतो. तसाच काहीसा प्रकार रोहितकच्या बाबतीत लालरंगाच्या साधारण दोन सेंटीमीटर बिया हिरव्या आवरणातून बाहेर पडतांना खुपच सुंदर दिसतात. पानगळ झाल्यानंतरचा पांढरा चकचकीत कहांडळचा अवतार पाहण्यात मन हरखून जाते. उन्हाळा संपता संपता बहावा आपल्या फुलांचा झुंबर दाखवून मन जिंकतो, ते काही औरच. खुप काही वेगवेगळ्या वृक्षांविषयी सांगण्यासारखे आहे. वेगवेगळी निसर्गाची सुंदर अशी उधळण बघण्याचा आणि निसर्गातील घटकांचा अभ्यास करण्याचा मोसम आला आहे. हे सर्व अनुभवण्यासाठी सकाळी १० वाजेपर्यंत किंवा दुपारची ४ नंतर वेळ अगदी योग्य. तर चला मग हे बघण्याचं नियोजन करा व आपला आनुभव मला नक्की कळवा.