पवारांच्या दरबारात प्रशांत किशोर
राजकारण आणि निवडणुकीतील चाणक्य अशी ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आहे. यानिमित्ताने प्रशांत यांची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. त्यांच्या कार्याचा हा वेध..

(लेखक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आहेत)
ई मेल – [email protected]
सेट झालेल्या आणि आता डबल सेंच्युरी करणारच इतका कॉन्फिडन्स असल्याचे दाखवणाऱ्या एखाद्या फलंदाजाला चक्क क्लीनबोल्ड करणाऱ्या बोलरच्या पुढच्या बॉलकडे सगळ्यांचे बारकाईने लक्ष असावे अशी काहीशी अवस्था सध्या प्रशांत किशोर यांची झाली आहे. बंगालची निवडणूक खिशात टाकून आणि पंजाबच्या कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासाठी काम करायची तयारी करतांनाच अचानक मुंबईमध्ये अवतार घेत शरद पवारांच्या सोबत भोजन घेत त्यांनी सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.
जी गत क्रिकेटमधल्या हॅटट्रिकच्या प्रतीक्षेत असणा-या बॉलरची होत असते तीच सध्या प्रशांत किशोर यांची झालेली आहे. देशातल्या निवडणुकांमध्ये जितकी चर्चा राजकारणी नेत्यांची होत असते त्यापेक्षाही जास्त चर्चा होत असते ती प्रशांत किशोर यांची. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्यासाठी लोकसभा निवडणुकीत काम केल्यावर पार्टी बदलून बिहारच्या निवडणुकीत चक्क नितीश-लालू भागीदारीला मदतीचा हात देणारे – आणि निवडणूक जिंकून देणारे प्रशांत किशोर, त्यानंतरच्या आणि देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या ठरणा-या उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये चक्क राहुल गांधींच्या बाजूला येऊन उभे राहत स्वतः सोबत कॉँग्रेसलाही दारुण पराभवाचा अनुभव देणारे प्रशांत किशोर, बंगालमध्ये जबरदस्तरित्या यशस्वी ठरले आहेत. अशा स्थितीत प्रशांत किशोर यांचा करिष्मा महाराष्ट्रात आणि त्याच्या बरोबरीने देशात काय चमत्कार दाखवणार ह्याबद्दल सर्वांना कुतूहल आहे.
जेमतेम पंचेचाळीशीच्या घरातले प्रशांत किशोर मूळचे बिहारचे. शहाबाद जिल्ह्यातले. त्यांचे वडील डॉक्टर होते. सार्वजनिक आरोग्य ह्या विषयात उच्च शिक्षण घेतल्यावर सुरुवातीला काही काळ त्यांनी बिहार आणि आंध्रप्रदेशमध्ये सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात काम केले आणि नंतर २०० ० सालच्या आसपास त्यांना युनोच्या जागतिक आरोग्य संघटनेत काम करण्याची संधी मिळाली.
तिथे ब-याच वरच्या स्तरावर काम करत असतांना साधारण २००७ च्या सुमारास ते भारतात आले होते आणि त्या प्रवासात त्यांची राहुल गांधींची भेट झाली. भारतासारख्या देशामध्ये असणा-या विविधतेचा विचार करून अनेक स्तर आणि विविधांगी विकासाच्या कल्पनेवर त्यांनी राहुल गांधींच्या बरोबर संवाद साधण्याचा पर्यत केला पण राहुल यांना त्या कल्पनांमध्ये फारसे स्वारस्य नव्हते असा प्रशांत किशोर यांना अनुभव आला.
राहुल गांधींनी अमेठी लोकसभा मतदार संघात एक रुग्णालय काढण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. राहुल यांच्याशी त्यावेळी त्याचे फारसे जमले नाही आणि परिणामी प्रशांत किशोर आपल्या युनोच्या कामाकडे परतले. २०१०मध्ये युनोच्या वतीने युनिसेफ चालवत असलेल्या चाडमधल्या मदत कार्यक्रमाची जबाबदारी त्यांना दिली गेली. भारताच्या नियोजन आयोगाच्या वतीने इथल्या सार्वजनिक आरोग्याच्या स्थितीबद्दलचे एक टिपण त्यांच्या पाहण्यात आले. त्यावर त्यांनी मनमोहनसिंगांना एक पत्र पाठवले. त्याला त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पण त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असणा-या मोदींनी त्या पत्राची मोदींनी लगेच दखल घेतली आणि लगेचच प्रशांत किशोर यांची भेट घेऊन मोदींनी त्यांना आपल्या राज्यात सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भात काम करणा-या सामाजिक यंत्रणेची जबाबदारी देऊन त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यास आपण उत्सुक आहोत हे दाखवून दिले. या कामात त्यांना मोदींच्या हाताखाली थेट त्यांच्या घरातून काम करण्याची संधी मिळाली होती.









