इंडिया दर्पण विशेष लेखमाला – राऊळी मंदिरी
नाजूक कमळावर शक्तीशाली हनुमान!
संपूर्ण देशांत हनुमान आंजनेय, हनुमानजी, मारुती, बजरंग, बजरंगबली, महावीर, पवनकुमार, पवनसुत अशा विविध नावांनी ओळखला जातो पुजला जातो. पवन म्हणजे वायु आणि अंजनीमाता यांचा हा सुपुत्र सप्तचिरंजीवां पैकी एक आहे. आजही जेथे रामकथा सांगितली जाते तिथे हनुमान कोणत्या ना कोणत्या रुपांत हजर असतो अशी श्रद्धा आहे. वाल्मीकि रामायणातील ‘सुंदर कांड’ हा भाग हनुमानाच्या विविध मनोरंजक लीलांनी समृद्ध झालेला आहे.

मो. ९४२२७६५२२७
राम आणि हनुमान यांची प्रथम भेट होते ती याच भागांत, हनुमानाला त्याच्या सुप्त शक्तींचा शोध लागतो, समुद्रावरुन हनुमानाचे उड्डान, सीतेचा शोध, लंका दहन ही सारी प्रकरणे हनुमानाची शक्ती, भक्ती आणि युक्ती यांची अजरामर उदाहरणं आहेत. भारतातील अबलावृद्ध हनुमानाच्या या अगाध लीला ऐकताना देहभान हरपून जातात. अशा या लोकप्रिय हनुमानाची देशांतल्या प्रत्येक गावांत मंदिर व मूर्ती नसत्या तरच नवल. म्हणुनच तर आपणही देशांतील सर्वांत मोठ्या भव्य दिव्य हनुमान मुर्तींचा परिचय करुन घेतो आहोत. ‘इंडिया दर्पण’ च्या वाचकांना आज आपण कर्नाटकातील दक्षिण बेंगलुरु जिल्ह्यातील अगारा गावच्या देशातील सर्वांत उंच हनुमान मुर्तीचा परिचय करुन देणार आहोत.
नाजूक कमळवर शक्तीशाली हनुमान
कर्नाटकातील दक्षिण बेंगलुरु जिल्ह्यांत अगारा ( आग्रा नव्हे!) या नावाचे लहानसे खेड़े आहे. याच गावांत जणु आकाशाशी हितगुज करणारी अतिशय उंच आणि भव्य अशी महाबली हनुमानमूर्ती आहे. विशेष म्हणजे १०२ फूट उंच असलेली ही हनुमान मूर्ती अति विशाल अशा कमळावर उभी आहे. दुरून हनुमानाची उंची आणि भव्यता पाहून माणुस नतमस्तक होतो आणि जवळ गेल्यावर ज्या भव्य कमळावर हनुमान उभे आहेत त्या कमळाची विशालता पाहून चकित होतो.
याचे कारण म्हणजे आपण सगळेच हनुमानाला शक्तीशाली समजतो. द्रोणागिरीसारखा पर्वत उचलून तो हातावर घेउन लीलया उडत जाणारा महाबली, शक्तीशाली, महाकाय हनुमानाला नाजुक, कोमल अशा कमळाच्या फुलावर उभं करणार्या मुर्तिकाराच्या कल्पक्तेचं कौतुक करावं तेवढं कमीच वाटतं!
बंगळुरु दर्शन मध्ये समावेश
हनुमानाची ही विशालकाय मूर्ती बंगळुरू शहराच्या दक्षिण भागांत चोविसाव्या मुख्य सारजापूर आउटर रिंग रोडवर स्थापन केलेली आहे. अगारा आणि आसपासच्या परिसरांतील भाविकांत हे मंदिर प्रसिद्ध होतेच पण ‘बंगळुरू दर्शन’ मध्ये या हनुमान मुर्तीचा समावेश झाल्या पासून माडिवाला आणि एच.एस.आर. कोरामंगल लेआउट एरियातील हे हनुमान मंदिर विशेष प्रसिद्ध झाले आहे. जिथे दररोज शे सव्वाशे भाविक येत तिथे हल्ली हजारो पर्यटक येतांत. मंगळवारी आणि शनिवारी तर येथे भाविक आणि पर्यटक यांची जणू जत्राच भरते.
हनुमान मूर्ती पासून जवळच अगारा नावाचा मोठा तलाव आहे. तलावा भोवती अनेक घनदाट झाड़ी वृक्ष वेली यांनी हा सर्व परिसर निसर्ग संपन्न आहे त्यामुळे उन्हाळ्यात येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. बंगळुरू शहरांत हनुमानाची अनेक मंदिरं आहेत. अनेक उंच, भव्य, विशाल हनुमान मूर्ती देखील या महानगरात आहेत.परंतु या सर्वांत प्रसिद्ध आहे तो अगारा गावातील १०२ फूट उंचीचा हनुमान. महाकाय कमळावर हनुमान उभा आहे. कमळच्या आकाराचा पाया गोलाकार असून त्याची उंची ६-७ फूट आहे. त्यामुळे हनुमानाला प्रदक्षिणा घालणारी व्यक्ती येथे अगदीच लहान भासते.
पारंपरिक दक्षिणात्य हनुमान
हनुमानाची ही मूर्ती पारंपरिक दक्षिणात्य पद्धतीची असून सुंदर परंतु भड़क रंगात रंगविलेली आहे. हा हनुमान शक्तीशाली असून दोन पायांवर उभा आहे. उजवा हात आशिर्वाद मुद्रेत असून डाव्या हाताने खांद्यावर गदा धारण केली आहे. हनुमानाच्या डोक्यावर सोनेरी मुकुट,गळ्यात सोन्याचे हार व दागिने परिधान केले आहेत हनुमानाच्या गळ्यात सुंदर मोठी गुलाबी रंगाची माळ आहे. हनुमानाच्या दोन्ही खांद्यावर गुलाबी रंगाचे उत्तरीय वस्त्र आहे. कमरे भोवती विविध रंगांची वस्त्रे व अलंकार आहेत. हनुमानाची ही मूर्ती १०२ फूट उंच तर आहेच परंतु अतिशय आकर्षक देखील आहे. अगारा येथील हनुमान मूर्ती पुर्वाभिमुख असून १९७६ मध्ये तयार करण्यात आली आहे. ही मूर्ती आणि येथील मंदिरं १३ एकर जागेवर पसरलेले आहे.अतिशय निसर्गरम्य परिसरांत ही मूर्ती आहे. मंदिराचे आर्किटेक्चर पॅगोडा पद्धतीचे आहे. हा हनुमान ‘अगारा अंजनेय हनुमान’ या नावानेही ओळखला जातो.
दर्शन वेळा लक्षांत ठेवा
अगारा येथील हनुमान मूर्ती भव्य असल्याने दिवसातून केंव्हाही पाहता येते मात्र मूर्ती जवळ जावून दर्शन घ्यायचे असेल किंवा येथील मंदिरांत पूजा अर्चा करायची असेल तर सकाळी ९ ते १२ आणि सायंकाली ६ ते ८ या वेळातच जावे. इतर वेळी मंदिराचे गेट बंद असते. बाहेर गावाहून ही हनुमान मूर्ती पहायला जाणार्या पर्यटकांनी ही सूचना जरुर लक्षांत ठेवावी. अगारा हनुमान पूर्वाभिमुख असल्याने सकाळी मुर्तीचा चेहरा सूर्य प्रकाशने उजळून निघतो तर सूर्यास्ताच्या वेळी सूर्य किरणं पाठमोर्या हनुमानाला सुशोभित करतात. येथे ड्रेसचे कोणतेही बंधन नाही. कोणताही भारतीय पेहराव येथे चालू शकतो. या हनुमान मंदिरापासून जवळच जगन्नाथाचे अतिशय सुंदर आणि देखने मंदिर आहे. अगारा फ्लायओव्हरच्या खालीच हे हनुमानजी आहेत. तेंव्हा बेंगलुरुला गेल्यावर येथे अवश्य भेट द्यावी असेच हे संस्मरणीय ठिकाण आहे.
Column Rauli Mandiri Shaktishali Hanuman by Vijay Golesar