कल्पवृक्ष कधी पहिला आहे का? नाही ना! पंचकेदार मधील पाचवे केदार असलेल्या कल्पेश्वर मंदिरापासून एक किमी अंतरावर असलेल्या गौरामातेच्या मंदिराजवळ कल्पवृक्ष पहायला मिळतो. दुर्वास ॠषींच्या शापापासून मुक्त होण्यासाठी देवांचा राजा इंद्र याने याच ठिकाणी भगवान शंकरांची आराधना केली. प्रसन्न होऊन भगवान शिवाने इन्द्राला मनातली कोणतीही इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष भेट दिला. तो याच ठिकाणी. म्हणूनच या स्थानाला ‘कल्पेश्वर’ असे म्हणतात. विशेष म्हणजे आजही हा कल्पवृक्ष आपल्याला येथे पहायला मिळतो.
हिमालयातील गढ़वाल प्रांताला देवभूमी म्हणतात. कारण हा संपूर्ण परिसर पवित्र मंदिरं आणि देवालयांनी समृद्ध झालेला आहे. या बर्फाच्छादित हिमालयात निसर्गाने आपलं सौंदर्य भरभरून प्रदान केलं आहे. अशा या पवित्र आणि निसर्ग समृद्ध गढ़वाल प्रांतातील चमोली जिल्ह्यात, उर्गम घाटित कल्पेश्वर नावाचे पाचवे केदार वसलेले आहे. समुद्र सपाटीपासून २१३४ मीटर म्हणजेच सुमारे साडेसहा हजार फूट उंचीवर वसलेल्या या मंदिरांत भगवान शिवाच्या जटांची पूजा केली जाते.
वर्षभर खुले राहणारेएकमेव केदार!
पंचकेदार मधील हे पाचवे केदार भक्तांसाठी वर्षभर खुले असते. पंचकेदार मधील केदारनाथ, मध्यमहेश्वर, तुंगनाथ आणि रुद्रनाथ ही मंदिरं प्रचंड बर्फवृष्टीमुळे हिवाळ्यात सहा महिने बंद असतात. एका दगडी गुहेत सुरक्षित असलेले कल्पेश्वर मंदिर मात्र वर्षभर उघडे असते. कल्पेश्वर मंदिराची कपाटं भाविकासाठी सदैव खुली असतात.
उर्गम घाटीत उर्गम या नावाचे गाव आहे. छोट्या, छोट्या पंधरा गावांचा हा समूह आहे. उर्गम पासून अडीच तीन किमी अंतरावर कल्पेश्वर मंदिर आहे. मंदिरापर्यंतचा रस्ता पायी चालण्यासाठी योग्य आहे.घनदाट झाडींनी अच्छादित उंच डोंगराखाली असलेल्या दगडी गुंफेत लांबट आकाराचे हे मंदिर आहे. सिमेंटच्या पायऱ्या चढून गेल्यावर सोनेरी रंगाच्या कमानीला घंटा टांगलेली आहे. कमानीवर आणि मंदिर परिसरात सर्वत्र भगवे ध्वज फडकताना दिसतात. सुरुवातीलाच भगवान शंकरांचे वहन असलेला दगडी नंदी आहे. येथे दगडी ओटयावर १२ लोखंडी त्रिशुल लाल रंगांच्या चुनरीसोबत लक्ष्य वेधून घेतात. बारा ज्योर्तिर्लिंगाच्या प्रतिकृती असलेली बारा शिवलिंगं येथे आहेत.
येथे होते केदारनाथ आणि तुंगनाथ दर्शन
येथून बाहेर आल्यावर दोन लहान दगडी मंदिरं आहेत. यात एका मंदिरांत केदारनाथ येथील शिवलिंग म्हणजे रेड्याच्या पाठीचा आकर असलेली त्रिकोणी लिंग तर दुसऱ्या मंदिरांत तुंगनाथ महादेवाची प्रतिमा आहेत. ज्या भाविकांना पंचकेदार मधील केदारनाथ किंवा तुंगनाथ येथील दर्शन घेणे शक्य होणार नाही त्यांच्यासाठी ही मंदिरं येथे आहेत.
थोडं पुढे गेल्यावर हनुमानाचे मंदिर आहे. हनुमानजी हे देखील भगवान शंकरांचा अवतार आहे असे मानले जाते. हनुमानजीची नित्य पूजा केली जाते. मंगळवारी विशेष पूजा करतात. मंदिरांत सर्वत्र अनेक घंटा बांधलेल्या दिसतात.अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यास घंटा वाहिल असे कबूल करतात आणि आपल्या कामना पूर्ण झाल्यावर येथे येउन कल्पेश्वर मंदिरात घंटा बांधतात.
अखंड प्रज्वलित धुनी
हनुमान मंदिरापुढे एक मोठी खोली आहे. हा एका साधुचा आश्रम आहे. येथे निरंतर तेवणारी धुनी आहे. बाजूला ३ लहान लहान प्राचीन दगडी नंदी आहेत. तेथेच बाजूच्या भिंतीवर पांडवाची धनुष्य, बाण, गदा, भाला इत्यादी आयुधे भिंतीवर कोरलेली आहेत. त्यानंतर यज्ञकुंड किंवा हवनकुंड आहे. येथे वेळोवेळी होम हवन केले जाते.
येथे दिसतात भगवान शिवाच्या जटा
याठिकाणी गुफेचा वरचा मोठा दगड खुपच पुढे आलेला आहे. या दगडावर भगवान शंकराच्या जटांचा आकार स्पष्ट दिसतो. यालाच जटेश्वर म्हणतात. येथे हनुमान, पार्वती, गणेश आणि भैरवनाथ यांच्या दगडी प्रतिमा आहेत. मोठ्ठा लोखंडी त्रिशूल लक्ष्यवेधी आहे. कपारिला लागुनच डाव्या बाजूला कल्पेश्वर भगवानाच्या गाभार्याचे प्रवेशद्वार आहे. या मंदिरात पाच फूट उंच ओट्यावर भगवान शंकराचे प्रतिक असलेला एक गोलाकार तांदळा आहे. पुजारी उभं राहूनच कल्पेश्वर भगवानाची पूजा करतात. कल्पेश्वर मंदिराचे पुजारी नेगी परिवारातील असतात.
व्याधीमुक्त करणारे कलेवर कुंड
कल्पेश्वर मंदिराच्या मागे खोलगट भागात एक नैसर्गिक दगडी कुंड आहे या कुंडाला ‘कलेवर कुंड’ म्हणतात. या कुंडातील पाणी अतिशय शुद्ध आणि थंड आहे. भगवान शंकरांच्या जटामधून हे पाणी येत असं सांगितलं जात. भगवान कल्पेश्वराच्या नित्यपूजेसाठी हेच पाणी वापरतात. श्रद्धाळू भाविक हे पाणी तीर्थ म्हणून पितात. या पाण्यात औषधी गुणधर्म असल्याने अनेक रोग-व्याधी बर्या होतात अशी भाविकांची श्रद्धा आणि अनुभव आहे.
कल्पेश्वर मंदिरात दरवर्षी शिवरात्रीला संतानप्राप्ती मेळा भरविला जातो. कोणत्याही मनोकामना येथे आल्यावर पूर्ण होतात असा हजारो-लाखो भाविकांचा अनुभव आहे. विशेषत: संतान प्राप्तीसाठी केलेली प्रार्थना येथे पूर्ण होतेच अशी भाविकांची दृढ़ श्रद्धा आहे. अनेकांना याची प्रचिती आलेली आहे. समुद्रमंथन करण्यापूर्वी भगवान शंकरानी याच कुंडातील पाणी देव आणि दानवांना दिले होते. या पाण्यामुळे समुद्र मंथन सुरळीत झाले व त्यातून चौदा रत्नं निघाली. या चौदा रत्नातील एक रत्न होते कल्पवृक्ष.
इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष
कल्पवृक्ष कधी पहिला आहे का? नाही ना! कल्पेश्वर मंदिरापासून एक किमी अंतरावर असलेल्या गौरामातेच्या मंदिराजवळ कल्पवृक्ष पहायला मिळतो. कल्पेश्वरला गेल्यावर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा खराखुरा कल्पवृक्ष पहायला मुळीच विसरु नका. केदारखंड पुराणांत याविषयी कथा सांगितली आहे ती अशी, दुर्वास ॠषींच्या शापापासून मुक्त होण्यासाठी देवांचा राजा इंद्र याने याच ठिकाणी भगवान शंकरांची आराधना केली. प्रसन्न होउन भगवान शिवाने इन्द्राला मनातली कोणतीही इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष भेट दिला. तो याच ठिकाणी. म्हणूनच या स्थानाला ‘कल्पेश्वर’ असे म्हणतात. विशेष म्हणजे आजही हा कल्पवृक्ष आपल्याला येथे पहायला मिळतो.
अहोरात्र कोसळणारा धबधबा
कल्पेश्वर मंदिराखालून कल्पगंगा नदी वाहते. कल्पगंगा नदीलाच ‘हिरण्यवती’ असेही म्हणतात. नदीच्या मंदिरापर्यंतच्या भागाला हिरण्यवती म्हणतात. तर कल्पेश्वर मंदिरापासून पुढच्या प्रवाहाला कल्पगंगा असे म्हणतात. ही नदी पुढे अलकनंदा नदीला मिळते आणि देवप्रयाग येथे अलकनंदा गंगेला मिळते. कल्पेश्वर मंदिर कल्पगंगेच्या काठावर आहे. कल्पगंगेच्या उजव्या बाजूला जी भूमी आहे तिला ‘दुर्वासा भूमी’ म्हणतात. येथेच ‘ध्यानबद्री’ मंदिर आहे.
कल्पेश्वर मंदिरापासून जवळच असलेल्या एका उंच पर्वत शिखारावरून एक धबधबा अहोरात्र कोसळतो.या प्रपाताचे सौन्दर्य अविस्मर्णीय आहे. विशेष म्हणजे हा जलप्रपात वर्षभर प्रवाही असतो. तो कधीही अटत नाही. मंदिराकड़े येतानाच निसर्गाच हा आविष्कार भाविकांचे लक्ष्य वेधून घेतो.
भैरवनाथ मंदिर
कल्पेश्वर मंदिरापासून एक किमी अंतरावर भैरवनाथ मंदिर आहे. भैरवनाथ म्हणजे या भागाचा क्षेत्रपाल. त्यामुळे कल्पेश्वराचे दर्शन घेतल्यावर भैरवनाथाचे दर्शन घेणे आवश्यक असते. शिवा जवळ पार्वती असतेच. पार्वती म्हणजे प्रकृती. येथे देखील कल्पेश्वर मंदिरापासून जवळच असलेल्या भैरवनाथ मंदिरा पुढेच गौरा मातेचे मंदिर आहे. कल्पेश्वराचे पुजारीच गौरा मातेची पूजा करतात.पहाटे गौरा मातेची पूजा झाल्या नंतर कल्पेश्वराची पूजा करण्याची प्रथा आहे. याच मंदिरा जवळ समुद्रमंथानाच्या वेळी बाहेर आलेला कल्पवृक्ष पहायला मिळतो.
कसे जावे
कल्पेश्वर येथे कार किंवा बाईकने जाता येते. कल्पेश्वरला जाण्यासाठी ॠषिकेष, देहरादून आणि हरिद्वार पासून थेट बस सेवा उपलब्ध आहे. ॠषिकेष पासून हे अंतर २४७ किमी आहे. ॠषिकेष पासून लारी गावापर्यंत रस्ता खुपच चांगला आहे.मान्सून मुळे कुठे कुठे रस्ता ख़राब होतो. लारी गावापर्यंत जीप, टॅक्सी,बस जाते. लारी गावापासून कल्पेश्वर मंदिर ३ किमी अंतरावर आहे हे अंतर पायी जाता येते.
निवास व भोजन व्यवस्था
पंचकेदार मधील कल्पेश्वर हे स्थान समुद्र सपाटी पासून सर्वांत कमी म्हणजे २२०० मीटर उंचीवर आहे. मंदिरापर्यंत रस्ता चांगला आहे. आणि हे मंदिर वर्षभर उघडे असते. उर्गम घाटित उर्गम नावाचे गाव आहे.येथून ३ किमीवर कल्पेश्वर मंदिर आहे. उर्गम गावात यात्रेकरुंना निवासाच्या व भोजनाच्या सोयी उपलब्ध आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!