इंडिया दर्पण विशेष लेखमाला
पॅव्हेलिअन
आशिया चषकाचा आज जणू अंतिम सामनाच
अवघ्या आठवडाभराच्या अंतरात भारत आणि पाकिस्तान क्रिकेटचे संघ पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांसाठी ही आनंदाची पर्वणी असली, तरी खेळाडूंसाठी मात्र त्यांच्यातल्या गुणवत्तेची “कसोटी” बघणारा हा कालावधी ठरणार आहे हे निश्चित. यासंदर्भात विश्लेषण करीत आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक जगदीश देवरे….
भारत आणि पाकिस्तान याच्यांमध्ये क्रिकेट सामने अतिशय कमी खेळले जातात. २८ ऑगस्ट २०२२ ला ज्या सामन्यात भारतीय संघाने पाकवर दिलखुलास मात केली. त्याआधी २८ ऑक्टोबर २०२१ ला दोन्ही संघात ट्वेन्टी-ट्वेन्टी सामना खेळला गेला आणि तो पाकिस्तानने जिंकला होता. थोडक्यात काय, तर तब्बल ३०८ दिवसांच्या अंतरानंतर या दोन्ही संघात हा सामना खेळला गेला होता. आता मात्र बोटावर मोजण्याइतक्या दिवसाच्या फरकाने पुन्हा एकदा उभय संघ झुंज देणार असून नेटाने लढणार आहेत.
मागच्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवलेला असल्याने सहजिकच या सामन्यात भारताचे पारडे जड असणार यात शंका नाही. परंतु, क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस नवीन असतो आणि प्रत्यक्ष सामन्याच्या दिवशी जो नेटाने लढेल तोच संघ जिंकतो असा अनुभव आहे. त्यामुळे भारतीय संघ उद्याच्या सामन्यात देखील तेवढ्याच नेटाने लढून आपला विजयपथावरचा प्रवास असाच पुढे चालू ठेवणार की, पहिल्या पराभवाने अतोनात वेदना झालेल्या पाकिस्तान संघाकडून करडी रिअॅक्शन बघायला मिळणार यावर आजच्या सामन्याचे भवितव्य ठरणार आहे.
गेल्या सहा-सात दिवसात तसा फारसा काही मोठा बदल झालेला नाही. ज्या रविंद्र जाडेजाने मागच्या सामन्यात भारतीय संघासाठी मैदानावर महत्वाची भूमिका बजावली होती. त्या रविंद्र जाडेजाची अनुपस्थिती हा एकमेव अपवाद सोडला तर भारतीय संघाची घडी आधी होती. तेवढ्याच सुस्थितीत आज मैदानावर दिसणार आहे. कदाचित अक्षर पटेल या सामन्यात जाडेजाची जागा घेईल अशी चिन्हे आहेत आणि तसे झाल्यास पाकिस्तानसाठी त्याची गोलंदाजी डोकेदुखीचा विषय ठरू शकते. पटेलचे गोलंदाजीतले अक्षर समजायला पाकिस्तानी फलंदाजांना जड जावू शकते. जाडेजाच्या आणि अक्षर पटेल यांची तुलना करणे शक्य नसले तरी गोलंदाजीबरोबरच मधल्या फळीत फलंदाजीला येवून मॅच फिनीश करण्याची क्षमता पटेलकडे नक्कीच आहे.
पाकिस्तानच्या बाबतीत देखील तेच घडलंय. शाहनवाज दलाणी हा त्यांचा जलदगती गोलदांज दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही. त्याची जागा हसन अली घेतो आहे. या दलानीने फलंदाजी करतांना अवघ्या ६ चेंडून १६ धावा ठोकल्या होत्या हे विसरून चालणार नाही. त्यामुळे पाकिस्तान संघासाठी एका मुख्य गोलंदाजाबरोबरच पिंच हिटरची देखील कमतरता जाणवणार आहे. याखेरीच या सात दिवसातली महत्वाची घटना म्हणजे या दोन्ही संघांनी दुबळ्या हॉंगकॉंग संघाचा पराभव केला आहे. भारतीय संघाने केलेला पराभव फार मोठा नव्हता मात्र पाकिस्तान संघाने एक मोठा विजय मिळवला, इतकाच काय तो फरक.
याआधी एकाच आशिया कप स्पर्धेत या दोन्ही संघांना अवघ्या आठवडाभराच्या फरकाने दोन सामने खेळण्याची वेळ इतिहासात दोनदा आली आहे. या दोन्ही स्पर्धा वन-डे प्रकाराच्या होत्या हे विशेष. सन २००८ ला २६ जून रोजी भारताने पहिला सामना जिंकला होता तर २ जुलैला झालेल्या दुस-या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळविला होता. त्यानंतर २०१८ साली १९ सप्टेंबर आणि २३ सप्टेंबर रोजी झालेल्या दोन्ही मात्र भारतीय संघाने विजय मिळवला होता आणि यातली ठळक बाब म्हणजे, ही स्पर्धा देखील दुबईत खेळली गेली होती. २०१८ च्या याच कामगिरीचा रिप्ले भारतीय संघाकडून या सामन्यात बघायला मिळावा अशी भारतीय चाहत्यांची इच्छा असणार यात शंका नाही.
भारतीय संघात खेळांडूंमध्येच चुरस आहे. के. एल. राहूल आणि रोहित शर्मा यांच्याकडून मागच्या रविवारी झालेल्या सामन्यात समाधानकारक कामगिरी झाली नव्हती. दुसरीकडे विराट कोहलीने आपल्या बॅडपॅच वर मात करण्याची सुवर्णसंधी साधली होती आणि अखेरच्या षटकापर्यंत उभे राहून पांड्याने विजयाचे हार्दिक स्वागत केले होते. त्यानंतर हॉंगकॉंग विरूध्द जो सामना झाला त्यात सुर्यकूमार कसा तळपला होता हे पाकिस्तानी कर्णधाराला डोक्यात ठेवून डावपेच आखावे लागणार आहेत. अशा बंपर सामन्यात हिरो बनण्याची कोणतीच संधी खेळाडू सोडू इच्छित नाहीत. त्यामुळे ही संघातर्गत स्पर्धा, भारतीय संघासाठी विजयाची नांदी ठरेल.
पाकिस्तान संघाकडे सर्वात मोठे अस्त्र आहे आणि ते म्हणजे दडपण. भारतीय संघाच्या आघाडीच्या फलंदाजांवर हेच दडपण आणण्यात यशस्वी होण्याची या संघाची धडपड राहील. तात्पर्य काय तर, या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड असणार आहे. या विजयानंतर भारतीय संघासाठी आशिया चषकाच्या विजेतेपदाचा दरवाजा तर उघडणार आहेच परंतु सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या संघासाठी आगामी ट्वेन्टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेसाठी हा विजय ‘बुस्टर डोस’ देखील ठरणार आहे.
Column Pavilion India Pakistan Match by Jagdish Deore
Asia Cup 2022 T20 Super4 Cricket