इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– निसर्गयात्री –
सूर्यदूत : अमोघ सहजे
सूर्य हा विश्वाचा नियंता आहे. पृथ्वीवरच्या ऊर्जाशक्तीचा मूलस्त्रोत आहे. अशा या सौरऊर्जेचा विधायक उपयोग करून पावरा आदिवासींच्या अंधारमय जीवनात सूर्याचा दूत बनून आलेल्या अमोघ सहजे या तरुणाचा परिचय आज आपण करून घेणार आहोत.

मो. 9423932203
सौरशक्ती ही मानवाला लाभलेलं अखंड वरदान आहे. सूर्याच्या ऊर्जेचा सर्वाधिक फायदा भारताला होतो. कारण भारतात वर्षातून जवळपास दहा महिने प्रखर सूर्यप्रकाश असतो. खरंतर पूर्वीच्या काळातदेखील भारतीयांना सौरशक्तीचे महत्त्व कळलं होतं, त्यामुळेच घरातलं धान्य उन्हात वाळवून टिकवणे, वस्तू उन्हात ठेऊन त्यांचं निर्जंतुकीकरण करणं, पाणी तापवणं अशा अनेक कामासाठी भारतीय गृहिणी फार पूर्वीपासून सौरशक्तीचा वापर करत असत. लहान मुलांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारं डी जीवनसत्व या सौरऊर्जेतून मिळतं.या सौर शक्तीचा उपयोग करून समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होतं. अशा कित्येक गोष्टी आहेत की, ज्या सुर्यदेवता भरभरून आपल्याला देत असते.आपली भारतीय संस्कृती ही कृतज्ञता मानणारी संस्कृती आहे. त्यामुळेच भारतीय समाजाने सूर्याला देवतेचं स्थान दिलं आहे. सूर्यउपासना,अर्घ्यदान,सूर्यनमस्कार या मधून आपण सूर्याबद्दल वेळोवेळी कृतज्ञता व्यक्त करत असतो. त्याच्या सहस्त्रादी हाताने आपल्याला ऊर्जा दान केल्याबद्दल त्याचे ऋण व्यक्त करत असतो.
महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यातला पावरा समाजातला आदिवासी समूह. खरंतर ही निसर्गाची लेकरं.कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम आयुष्यापासून चार हात लांब रहाणारी. शहरांच्या सुख सोयींपासून पूर्णपणे अलिप्त. वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुखसोयीपासून वंचित. भिल्ल जमातीचे हे रहिवासी.क्वचितच कुठेतरी गावात शाळा किंवा स्वच्छतागृह दिसतात. कुपोषण आणि गरिबी ही गावातली मुख्य समस्या. कोणी ट्रेकिंगसाठी जंगलात गेले तर तेवढाच त्यांचा शहरातल्या लोकांशी संबंध. नाहीतर आजूबाजूला विस्तीर्ण जंगल हेच त्यांचे विश्व पण, अन्न शिजवण्यासाठी सरपणासाठी लाकूडतोड ही त्यांच्यासाठी कष्टमय पण अपरिहार्य गोष्ट होती.अशा वेळेला पावसाळ्याच्या दिवसात तर लाकूड ओलं झाल्यानंतर त्यांचे हाल कठीण होतात.
संध्याकाळच्या वेळेस सूर्य मावळायला लागला की आदिवासी माऊली तिच्या छोट्याशा झोपडीत लाकडाचा भारा घेऊन जाते. अत्यंत कोंदट वातावरणात, धुराच्या लोटामध्ये ती चूल पेटवते आणि थकूनभागून आलेल्या तिच्या कुटुंबासाठी जेवण बनवते. हा धूर किती धोकादायक आहे.त्याचा तिच्या शरीरावर किती वाईट परिणाम होत असेल याची तिला दूर दूरपर्यंत कल्पनाही नसते. अशावेळी अमोघ सहजेसारखा सुशिक्षित तरुण त्याच्या संशोधनासाठी नंदुरबारचा आदिवासी पावरा समाज निवडतो आणि त्यांचं आयुष्य बदलण्यासाठी सौरऊर्जेच्या ताकतीची ओळख इथल्या लोकांना करून देतो .
मुंबईत जन्मलेल्या आणि वाढलेल्या अमोघने 2014 मध्ये बंगळुरच्या आयआयएससीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर निसर्ग संवर्धनाच्या वेगळ्या वाटेवरती जाण्याचा निर्णय घेतला. एका जनगणनेच्या अहवालात अमोघने या गावाबद्दल वाचले. कोणत्याही प्रकारच्या सुखसुविधा नसणारं हे गाव संशोधन करण्यासाठी अमोघला आदर्श वाटलं. आदिवासींची स्वयंपाकासाठीची लाकूडफाटा जमा करण्याची पायपीट पाहून तो अस्वस्थ झाला.इथल्या लोकांची लाकूड गोळा करण्यासाठी लागणारी मेहनत वाचावी आणि आरोग्याला घातक अशा धुरापासून संरक्षण व्हावे या उद्देशाने सरपणाला पर्याय म्हणून सोलर पॅनल्स तयार करण्याची कल्पना अमोघने मांडली .आदिवासी भागातील मुलांच्या मदतीने अत्यल्प खर्चात त्याने सोलार स्टोव्ह मॉडेल तयार केलं. आरशाचे तुकडे एका पॅनलवर लावून त्याद्वारे सौरऊर्जा केंद्रित करून अन्न शिजवण्याचं हे मॉडेल तयार झालं.
या सोलार स्टोव्हवर कमीत कमी पाच ते सहा किलो अन्न शिजू शकतं. ह्या सोलर पॅनलची किंमत 1000 ते 2000 रुपये असते. व्यवस्थित काळजी घेतली आणि पावसात भिजण्यापासून त्याला थांबवलं तर ती वर्षानुवर्ष टिकतात. नैसर्गिक आपत्तीत त्यातील आरश्यांचं काही नुकसान झालं तरी ती अल्प खर्चात ते बदलता येतात. हे सोलर पॅनल कसे बांधायचे,कसे वापरायचे याचं मार्गदर्शन त्याने घेतलं. या पॅनल्सचं वेगळेपण म्हणजे डू इट युअरसेल्फ(DIY) असं आहे. अशा प्रकारचे मॉडेल खरंतर झिंबाब्वे आणि बोलिवियाच्या खेडेगावांमध्ये सुरवातीला तयार करण्यात आले होते. घाणामधील ‘पार्टनर्स इन्ससटेनेबल डेव्हलपमेंट’ नावाच्या एका संस्थेत अमोघने संपर्क साधला आणि त्यांच्या सोलर पॅनलच्या डिझाईनप्रमाणे या सोलर पॅनलची रचना केली.
सुदान आणि झिम्बाब्वेसारख्या वाळवंटी देशातही हा प्रयोग यशस्वी झाला आहे. गॅस सिलेंडरचे वाढते दर, वृक्षतोड आणि महागड्या सौरऊर्जेच्या साधनांना सशक्त पर्याय निर्माण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि तो यशस्वी केला. सुदान मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत यूएनडीपी पायलट प्रोजेक्ट मध्ये 350 सोलर स्टोव्ह अमोलने बनवून दिले. स्विझर्लंडमध्ये देखील या मॉडेलचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. ह्या सर्व यशस्वी प्रयोगांचं फलित म्हणजे वृक्षतोड थांबवणं आणि वायुप्रदूषणापासून मुक्ती.
अमोल सहजे म्हणतो,” सध्या मी पावरा समाजाची संस्कृती आणि परंपरा वाढवण्याचा प्रयत्न करतोय. बांबूपासून बनवलेले गंगुल हे त्यांचं पारंपारिक वाद्य मी पुन्हा शोधून काढलं आहे. जे काही दशकांपूर्वी हा समाज वापरत असे परंतु, सध्या ते नामशेष झालं होतं. गावकऱ्यांना मी पुन्हा त्यांची संस्कृती आठवून देतो आणि त्यामुळे या समाजातील लोकांनीदेखील पुन्हा एकदा त्यांचे हे वाद्य वाजवायला सुरुवात केली आहे. हे गंगुल कसं वाजवायचं याची मी एक छोटीशी पुस्तिकादेखील लिहिली आहे. कारण जगाला या वाद्याची माहिती व्हावी आणि या गावकऱ्यांनी हे वाद्य बनवून जगाला विकावं अशी माझी खूप इच्छा आहे.”अमोघला कुपोषणाविरुद्ध लढणाऱ्या या गावकऱ्यांसाठी अत्यंत कमी खर्चात आरोग्यदायी पौष्टिक खाद्यपदार्थ मिळवून देईल अशा दुकानांची साखळी स्टार्टअपद्वारे सुरू करण्याचा मानस आहे.
सूर्य हा विश्वाचा नियंता आहे. पृथ्वीवरच्या साऱ्या ऊर्जेचा मूलस्त्रोत सूर्य हाच आहे. सूर्याची नैसर्गिकशक्ती अखिल जीवसृष्टीमध्ये चैतन्य आणि ऊर्जा भरते. आपण या नैसर्गिक शक्तीच्या जितके जवळ जाऊ तितकं मानवाचं आरोग्य निरोगी आणि चैतन्यमय राहील. मानवाची जीवनशैली सूर्याच्या ऊर्जेचा थेट उपयोग करणारी असली पाहिजे.’आरोग्यम् भास्करात इच्छेत’ असे वचन आहे. त्याचा अर्थ सामान्यतः असा आहे की,” सूर्यनमस्कारासारखे व्यायाम,उन्हातून ड जीवनसत्व मिळणं ,सूर्यप्रकाशामुळे निर्जंतुकीकरण होणं अशा उपायांनी आरोग्याची प्राप्ती करून घेता येते.”म्हणजेच मानवाची जीवनशैली आणि पर्यायाने विकासनीती ही खरंतर सूर्याशीच संबंधीत आहे. सौर ऊर्जा ही परिवर्तनवादी ऊर्जा आहे. तिचा जास्तीत जास्त वापर करू या. निसर्गातल्या पंचमहाभूतांचा आदर करू या. ज्या व्यक्तीची जीवनशैली सूर्याच्या निकट जाणारी असते,ती व्यक्ती अधिक आत्मनिर्भर आणि आरोग्यपूर्ण असते.
Column NisargaYatri Solar Friend Amogh Sahaje by Smita Saindankar