इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– निसर्गयात्री –
झारखंडची लेडी टारझन : जमुना तुडू
झारखंडमधील जंगलांमध्ये बेकायदेशीर जंगलतोड करणाऱ्या लाकूड माफीया आणि नक्षलवाद्यांशी मोठ्या धैर्याने सामना करणाऱ्या, प्रसंगी जीवाची बाजी लावून जंगलांची राखण करणाऱ्या पद्मश्री पुरस्कारप्राप्त जमुना तुडू या साहसी महिलेची या सदरात आपण ओळख करून घेणार आहोत.
जमुना तूडू यांचा जीवन प्रवास पहात असताना 1973 सालचं सुंदरलाल बहुगुणा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं चिपको आंदोलन आठवल्याशिवाय राहत नाही. पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारतात झालेलं हे पहिलंच अनोखं आंदोलन होतं. या आंदोलनात जंगलतोड करणारे ठेकेदार जेव्हा वृक्षतोड करण्यासाठी जंगलात येत, तेव्हा गावोगावच्या असंख्य महिला आपल्या लहान मुलांसमवेत वृक्षतोड थांबवण्यासाठी झाडांना कवटाळून उभ्या रहात आणि ‘ये पेड कटने नही देंगे’ च्या घोषणा देत. त्यात गढवालची गौरादेवी, सुदेशादेवी, बचनीदेवी यांसारख्या स्त्रिया हिरिरीने उतरल्या. गौरादेवीने गावागावांत फिरून स्त्रियांना एकत्र आणले आणि जंगलात ‘चिपको’ आंदोलन सुरू केले. ठेकेदारांनी स्त्रियांना विवस्त्र करण्याच्या धमक्या दिल्या. पण, एकाही स्त्रीने ठेकेदारांच्या धमक्यांना भीक घातली नाही आणि शेवटी ठेकेदाराच्या मजुरांना माघार घ्यावी लागली. म्हणजेच फार पूर्वीपासून जंगल रक्षणासाठी स्थानिक जंगलवासीयांचे योगदान फार मोठं आहे. विशेषतः तिथल्या स्त्रियांचं.
जमुना तुडू ही त्यापैकीच एक.जमुना तुडूचा जन्म ओरिसा मधल्या मयूरभंज इथे झाला. लहानपणापासून निसर्गाच्या सानिध्यात वाढलेल्या जमुनाला जंगलांबद्दल अतिशय प्रेम होतं. मुतुरखांब या गावातील मानसिंग तुडू यांच्याशी तिचं लग्न झालं. सासरच्या घरी आल्यानंतर घराच्या मागच्या बाजूला असणाऱ्या जंगलात सर्रास मोठमोठे वृक्ष तोडून नेत असताना तिने पाहिलं. जंगलामध्ये सगळीकडे ठिकठिकाणी लाकडाच्या कोंडक्यांचे ढीग पडलेले तिला दिसत होते. जंगलातच लहानाची मोठी झालेल्या जमुनाला हे चित्र खूप अस्वस्थ करणारं होतं.तिच्या समाजातलं कोणीही या विरुद्ध काहीही आवाज उठवत नव्हतं आणि मग एके दिवशी धनुष्य,बाण, तीर, कामटे या आयुधांच्या सहाय्याने जमुना एकटीच या लाकूड माफीयांशी लढा देण्यासाठी सज्ज झाली. काठ्या लाठ्या घेऊन जमुना लाकूडतोड्यांच्या मागे धावू लागली. प्रत्येक वेळेला त्यांना एकटी प्रतिकार करत राहिली.
सुरुवातीला याला काळजीपोटी कुटुंबीयांचा पूर्ण विरोध होता. पण हळूहळू तिच्यासोबत गावातील इतर महिला देखील संघटित झाल्या. झारखंड मधील बेकायदेशीरपणे वृक्षतोड रोखणाऱ्या ‘वनसुरक्षा समितीची’ त्यांनी स्थापना केली. जमुना आणि तिच्या उत्साही कार्यकर्त्यांनी मातुरखामच्या जंगलांचं संरक्षण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. बाण ,धनुष्य, काठ्या घेऊन या महिला जंगलात गस्त घालू लागल्या. सकाळ, दुपार,संध्याकाळ अशा तिन्ही वेळेस आळीपाळीने जंगलावर देखरेख ठेवण्याची कामगिरी या महिला करता करत असत. एकदा या लाकूडमाफीयांनी रात्री जंगलाला आग लावण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून जमुनाच्या नेतृत्वाखाली या महिला रात्रीच्या वेळीही जंगलात गस्त घालू लागल्या.
जमुनाच्या या धाडसामुळे तिला ‘लेडी टारझन’ या नावाने आता ओळखलं जाऊ लागलं. जमुनाने आणि तिच्या सहकाऱ्यांनी आजूबाजूच्या गावांमध्येदेखील जंगलं वाचवण्यासाठी तिथल्या सरपंचाकडे जाऊन जंगल संरक्षणासाठी सहकार्य मागितले. काहींनी अनुकूल प्रतिसाद दिला तर काहींना मात्र पटवून देण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागले. अनेक वेळा त्यांच्यावर प्राणघात हल्ले झाले पण जमूनाने हार मानली नाही.जमुना सांगते की,” एकदा मी आणि माझे पती रेल्वे स्टेशनवर माफीयांना जंगलातील लाकडाची वाहतूक करण्यापासून रोखण्यासाठी गेलो तर आम्हाला त्यावेळी धारदार दगडांनी मारण्यात आलं. माझे पती रक्ताच्या चारोळ्यात पडले परंतु परमेश्वराची कृपा म्हणून त्यादिवशी आम्ही वाचलो.” अशा भयंकर हल्ल्यानंतरही जमुना तुडू त्यांच्यापुढे झुकल्या नाहीत. कालांतराने जमुनाचा प्रेरणादायी लढा पाहून झारखंड सशस्त्र पोलीस देखील तिच्यासोबत जंगल रक्षणाचे काम करू लागले आहेत. गावातल्या महिला आता झाडांना आपला भाऊ मानतात.झाडांना राखी बांधतात.
मागील 20 वर्षात तिने झारखंडमधील 50 हेक्टर जंगल उध्वस्त होण्यापासून वाचवलं आहे. 10000 महिलांना एकत्रित करून त्यांना झाडं आणि वन्यजीवांचं संरक्षण करण्यासाठी प्रेरित केलं.आज त्यांच्या गावात मुलीच्या जन्मानंतर 18 झाडं आणि मुलीच्या लग्नाच्या वेळी 10 झाडं लावली जातात. भारताचा चौथा सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मश्री त्यांना प्राप्त आहे. झारखंडची लढवैयी पर्यावरणवादी म्हणून तिच्या उल्लेखनीय योगदानासाठी जमुना तूडू हिला 2014 ला स्त्री शक्ती पुरस्कार आणि 2013 ला कॉर्डे फिलिप्स शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नीती आयोगाने तिची वुमन ट्रान्सफॉर्मर इंडिया अवॉर्ड (देशातल्या 20 प्रभावशाली स्त्रियांमध्ये)2017 साठी निवड केली. 2016 मध्ये तिला राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर 2019 मध्ये तिला देशातला चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला.
ऑल इंडिया रेडिओद्वारे प्रसारित ‘मन की बात’ मध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमुना तुडूच्या साहसी कार्याची प्रशंसा केली. अत्यंत धीटपणे जमुना म्हणते ,”आतापर्यंत वनअधिकाऱ्यांशी माझा कोणताही मोठा संघर्ष झाला नाही पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी जर कायद्याचं उल्लंघन केलं तर मी त्यांच्यावर कारवाई करण्यास घाबरेन. मग ते सर्वसामान्य लोक असो किंवा सरकार.” आदिवासी समाजात परंपरेच्या नावाखाली निरर्थक प्राणी मारणं हे जमुनाला मान्य नव्हतं. त्यासाठीदेखील तिने गावोगावी जनजागृती मोहीम चालवली. अनेक संदेशासह मोक्याच्या ठिकाणी पोस्टर्स लावले, तिथल्या आदिवासी बांधवांना निष्पाप प्राण्यांना मारण्यात किती व्यर्थता आहे हे पटवून देण्यासाठी गावांना भेटी दिल्या.
आदिवासी हा खरा जंगलाचा राजा आहे.आदिवासी बांधवांच्या निसर्ग पूजक रूढी, परंपरा,संस्कृती यामुळे मूळ माणसाचं अस्तित्व टिकून आहे.निसर्गाची नैसर्गिकता टिकून आहे. निसर्ग रक्षण करण्यामध्ये आदिवासी बांधवांचे मोठे योगदान आहे कारण निसर्ग पूजा हाच त्यांचा देवधर्म. सर्वसामान्य माणसाची समजूत अशी आहे की, हे जग परमेश्वराने केवळ त्यांच्या उपभोगासाठी निर्माण केलं आहे आणि त्यातील प्रत्येक घटकाचा जास्तीत जास्त उपभोग घेणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. पण कोणत्याही स्वार्थाचा लवलेशही नसलेल्या ह्या जंगलातल्या स्थानिक जमाती मात्र त्याच्या रक्षणासाठी जीव पणाला लावतात. कमीत कमी प्राथमिक गरजा असणारा हा समाज आयुष्यात खरा श्रीमंत आहे.समाधानी आहे.निसर्गाचं नियमन करणारी एक दैवी शक्ती आहे. ती या सर्वांना न्याय देत असते. कोणी तिला मूर्त स्वरूपात बघतात तर कोणी अमूर्त स्वरूपात.निसर्गाचे खरे वारसदार तर ही परमेश्वराची लेकरं आहेत.
Column Nisargayatri Jharkhand Lady Tarzan Jamuna Tudu by Smita Saindankar