अनवाणी इकॉलॉजिस्ट : तुलसी गौडा
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 2020 चा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मश्री’ स्विकारण्यासाठी जेव्हा 78 वर्षांच्या तुलसी गौडा अनवाणी पोहोचल्या. तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्या वेगळेपणाने त्यांच्याकडे वळल्या. अतिशय साधं व्यक्तिमत्व. आज आपण त्यांच्याच जीवनावर प्रकाश टाकू…

मो. 9423932203
हलक्की ओककलू या आदिवासी समुदायाची ही वृक्ष देवी. त्यांच्या समाजाची शान आहे. त्यांचे जंगल आणि औषधी वनस्पतींमधील ज्ञान खरोखरच अविश्वसनीय पण तेवढेच अमुल्य आहे.कोणीही त्यांच्या कामाचं आत्तापर्यंत दस्तऐवजीकरण केलेलं नाही. तसेच त्या चांगल्या संवादकही नाहीत त्यामुळे, ज्यांनी प्रत्यक्ष त्यांचं काम पाहिले आहे त्यांनाच निसर्गासाठी त्यांनी दिलेले योगदान किती महत्त्वाचं आहे हे समजू शकतं.
तुलसी गौडा यांचा जन्म 1944 मध्ये कर्नाटक राज्यातील अंकोला तालुक्यातल्या ओककलू गावातील हलक्की या आदिवासी आदिवासी कुटुंबात झाला. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या तुलसीचे वडील दोन वर्षाची असतानाच मरण पावले. त्यानंतर त्या त्यांच्या आईसोबत पाळणाघरात दिवसा मजूर म्हणून काम करत असत. शाळेचा तर दूरदूर संबंध नव्हता. वयाच्या 12व्या वर्षी एका वयस्कर व्यक्तीशी त्यांचं लग्न झालं त्यांचे पती लवकरच निधन पावले. त्यावेळी एका रोपवाटिकेत कर्नाटक वनीकरण विभागासाठी बियाणांची काळजी घेण्याचं काम तुलसी गौडा यांच्या पतीकडे होतं आणि मग तेच काम तुलसी यांनी पुढे पस्तीस वर्ष केलं.
तुलसी गौडा यांनी जंगलाचं एवढं ज्ञान कसं गोळा केलं हा प्रश्न खरं तर सर्वांनाच पडतो. कारण जंगलातील जवळजवळ प्रत्येक वृक्ष प्रजातीचं ज्ञान त्यांनी त्यांच्या आयुष्यभराच्या वृक्ष सेवेतून मिळवलं आहे .कोणत्याही वनस्पतीचा लहान-सहान तपशीलदेखील केवळ त्या वनस्पतीला स्पर्श करून सांगू शकतात .त्यामुळे संशोधक आणि पर्यावरण शास्त्रज्ञांसाठी त्या “जंगलाचा विश्वकोश” म्हणून ओळखल्या जातात तर, त्यांच्या या विशेष कौशल्याची जाण असणारी मंडळी त्यांना “ अनवाणी इकोलॉजीस्ट” असंही म्हणतात.
तुलसी गौडा यांची खासियत म्हणजे त्या कोणत्याही प्रजातीचे “मातृवृक्ष” ओळखू शकतात. मातृवृक्षांचे पर्यावरणाच्या समतोलासाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांना ‘मदर ट्री’ असंही म्हटलं जातं. हे वृक्ष त्यांच्या स्वतः च्या आणि इतर प्रजातींच्या वनस्पतींशी संवाद साधू शकतात. ते त्यांच्या अनुवंशिक नातेवाईकांशी नातेसंबंध निर्माण करतात. वैज्ञानिक डॉ. सिमर्ड आणि इतरांच्या संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की, ही सर्वात मोठी आणि जुनी झाडं, जंगलातील इतर छोट्या झाडांशी जास्त घट्ट जोडलेली असतात.
हे मातृवृक्ष मध्यवर्ती केंद्र म्हणून कार्य करतात आणि इतर शेकडो वृक्षांना अतिरिक्त कार्बन आणि नायट्रोजनचा त्यांच्या नेटवर्कद्वारे पुरवठा करतात. तुलसी गौडा या मातृवृक्षांची बियाणे गोळा करून त्यांचे पुनरुत्पादन करतात. ही एक अतिशय कठीण प्रक्रिया आहे. कारण रोपांचं अस्तित्व सुनिश्चित करण्यासाठी मातृवृक्षापासून उगवणार्या बिया त्यांना गोळा कराव्या लागतात. त्या कुठे मिळतील आणि कधी मिळतील याचा उलगडा गौडा सहज करू शकतात. तसेच बियाणे पेरल्यानंतर त्याला कोणत्या वेळी कधी फुले येतील याची अचूक वेळ त्या सांगतात. जंगलातील असंख्य औषधी वनस्पती त्या ओळखू शकतात. हल्लकी जमात ही त्यांच्या औषधी वनस्पतींच्या ज्ञानासाठी ओळखली जाते.याचा उपयोग ते लोकांना बरं करण्याऐवजी रोग टाळण्यासाठी करतात आणि हाच वारसा तुळशी गवडा यांनी पुढे चालवला आहे.
निवृत्तीनंतर त्यांनी कर्नाटकात स्वतःहून एक लाख झाडे लावून त्याद्वारे बरंच वनक्षेत्र पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला आहे. निवृत्तीनंतर त्या आता त्यांच्या गावात तुलसी आजी म्हणून ओळखल्या जातात. आपल्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाग जंगलाच्या संरक्षणासाठी त्यांनी घालवला आणि अजूनही त्या तेच करत आहे. त्यांना 1986मध्ये “ इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार”आणि 1999 मध्ये कन्नड राज्योत्सव पुरस्कार मिळाला. तसेच याशिवाय त्यांना असेच सन्मानाचे एक डझनहून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत .त्या म्हणतात,” पद्मश्री मिळाल्याचा आनंद तर आहेच, पण त्यामुळे त्यांच्यादृष्टीने जंगलं आणि झाडं यांचे महत्त्व कमी होत नाही.” त्यांना नाव आणि प्रसिद्धी पेक्षा त्यांचं कर्म अधिक महत्वाचं वाटतं. त्या अत्यंत संयमी आहेत. त्यांच्या या विश्वात इतरांना सामावून घेताना त्या आपल्याला अतिशय सावधपणे प्रवेश देतात.
येलाप्पा रेड्डी, सेवानिवृत्त आयएफएस अधिकारी यांनी त्यांची क्षमता लक्षात घेतली आणि त्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणले. तुलसी गौडा म्हणतात, “आम्हाला जंगल हवे आहे. जंगला शिवाय पाणी नाही, पिके नाहीत, सूर्य असहय होईल. त्यासाठी जंगलं भरभराटीला आली पाहिजेत” सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगातही निसर्गाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे हे आपण सर्वच जाणतो.
सध्याच्या कोरोना काळातील कठीण परिस्थितीत ऑक्सिजन चे महत्त्व किती आहे हे प्रत्येकालाच जाणवले. अशावेळेला आपल्या जंगलांचं संरक्षण आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी स्थानिक लोकांचे वृक्षज्ञान आणि नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापनकौशल्य मानवाला आलेल्या प्रत्येक नैसर्गिक संकटांशी लढा देण्यासाठी उपयोगी पडेल यात शंका नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत नावाप्रमाणेच पूजनीय अशा वृक्षदेवी तुलसी गौडा यांचं निसर्गरक्षणातलं योगदान उल्लेखनीय आहे यात शंकाच नाही.