बुद्धीबळपटू होण्यासाठी त्याने सोडली चक्क शाळा!
नाशिकला बुद्धिबळ खेळाची फार मोठी किंवा गौरवशाली म्हणता येईल अशी परंपरा नाही. तरीही जगातील २१ व्या स्थानावर आणि भारतात दुसऱ्या स्थानावर नाशिकच्या विदित गुजराथीने झेप घेतली. खेळाची आवड, प्रचंड मेहनत घेण्याची तयारी, कुशाग्र बुद्धिमत्ता, ध्येयाबद्दल अविचल श्रद्धा असेल तर बुद्धिबळ खेळात लक्षणीय प्रगती करता येते हे विदितने दाखवून दिले आहे. थोडक्यात मोठे व्हायची वाट त्याने पुढील खेळाडूंना दाखविली आहे. आता त्याच मार्गावरुन आणखी एक नाशिककर जाण्यासाठी सज्ज झाला आहे. किंबहुना त्याने काही पावले मार्गक्रमण केलेही आहे. त्याचे नाव आहे कैवल्य संदीप नागरे….
अवघ्या १४ वर्ष वयाचा हा खेळाडू उद्याचा विदीत गुजराथी होण्याचे स्वप्न पाहतो आहे. त्यादृष्टीने त्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. Doctorate ज्योतिषी आणि वास्तुशास्त्रज्ञ वडील लाभलेल्या या मुलाने बुद्धिबळ खेळावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी वयाच्या ११ व्या वर्षी चक्क शाळाच सोडली आहे. कारण खेळाची प्रॅक्टीस रोज दहा ते बारा तास करावी लागते. हा अत्यंत अवघड निर्णय त्याचे प्रशिक्षक जिनियस चेस अकादमीचे ओंकार जाधव आणि वडील संदीप यांनी घेतला. पण कैवल्यच्या आईची संमती मिळवण्यासाठी सहा महिने जावे लागले. त्यानंतर मात्र कैवल्यने मागे वळून पाहिले नाही. आपल्या पहिल्याच राज्य पातळीवर स्पर्धेत तो unrated होता. मात्र, त्याने नऊ पैकी ७.५ गुण मिळवून तब्बल १७०० गुणांकन (ELO Rating) मिळविले.
गेल्या २-३ वर्षांतील त्याची घोडदौड चकीत करणारी आहे. ही बाब त्याच्या कुटुंबियांना आणि प्रशिक्षकांना अतिशय समाधान देणारी आहे. औपचारिक शिक्षण न घेण्याचा निर्णय योग्य ठरु लागला आहे, असे त्याच्याबाबतीत म्हणायला हरकत नाही. कैवल्य हा महाराष्ट्राचा चौदा वर्षांखालील गटात ८/९ गुण मिळवून विजेता झाला. त्याच गटात राष्ट्रीय स्पर्धेत तिसरा आला (९/११ गुण). यानंतर तो वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. त्याने International Master सौम्या सोमनाथन, विक्रमादित्य कुलकर्णी, सोहम दातार, मोहम्मद शेख या त्याच्यापेक्षा जास्त rating असलेल्या खेळाडूंना हरवून त्याने नववे स्थान मिळविले.
इतका पराक्रम केल्यावर साहजिकच त्याची जागतिक स्पर्धेसाठी चौदा वर्षांखालील भारतीय संघात निवड झाली. त्याने इतकी मोठ्या स्पर्धेत प्रथमच भाग घेत असतानाही त्याने चांगली कामगिरी केली (६/११). अलीकडेच तो आशियाई स्पर्धेत १५ देशातील ९४ खेळाडूत (७.५/९) तिसरा आला आहे. आपली खेळावरील पकड त्याने घट्ट केली आहे. क्रिकेटमध्ये जसे पूर्वी कसोटी सामने होते, तथापि आता एक दिवसीय आणि टी20 आले आहेत. खेळाडूंना तिन्ही प्रकारात प्राविण्य मिळवावे लागते. तसेच बुद्धिबळ खेळातही standard, rapid (जलद) आणि blitz (अति जलद) असे प्रकार आहेत. कैवल्य तिन्ही प्रकारच्या खेळात माहीर झाला आहे. याचे कारण त्याच्या प्रशिक्षकांनी लहानपणीच त्याच्याकडून बुद्धिबळ खेळाचे तंत्र आणि मंत्र शिकविले. तसेच, Artur Yusupov या लेखकाने लिहिलेल्या Build Your Chess, Boost Your Chess आणि Chess Evolution या तिन्ही ग्रंथांचे पारायण आणि ते प्रत्यक्षात कसे उपयोगी ठरेल याची परीक्षा घेतली आहे. त्यामुळेच चेस मधील कोणत्याही समस्यांवर उपाय त्याला सापडतो आहे.
कैवल्यचे आजचे रेटिंग std 1845, Rapid 1535 आणि Blitz 1460 असे आहे. ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे. बुद्धिबळ खेळाडू सहसा पांढरे मोहरे असले तर जिंकण्याचे प्रमाण जास्त असते. पण कैवल्यचे काळे मोहरे असतानाचे जिंकण्याचचे प्रमाण तिन्ही प्रकारात ६० ते ७० टक्के आहे, हे विशेष. इतकी चांगली तयारी केल्यावर त्याला यश मिळाले नाही तरच नवल! प्रश्न आणि भीती फक्त एकच आहे शिक्षण न घेण्याचा धोका पत्करला आहे. प्रचंड स्पर्धेत हवे तितके यश मिळाले नाही किंवा कैवल्यचा वय वाढल्यावर चेस मधील रस कमी झाला किंवा तारुण्यातील इतर गोष्टी त्याला आकर्षित करु लागल्या तर काय? Your guess is as good as mine!