इंडिया दर्पण विशेष लेखमाला – नर्मदे हर
प्रत्यक्ष पायी नर्मदा परिक्रमा
नमस्कार, नर्मदा परिक्रमा या धार्मिक यात्रेबाबत आपण सध्या इंडिया दर्पणच्या माध्यमातून सखोल माहिती घेत आहोत. यात पायी नर्मदा परिक्रमा कशी करावी? कुठून सुरु करावी? केव्हा करावी? का करावी? पायी परिक्रमेचा कालावधी, नियम, यात्रेत सोबत घ्यावयाच्या आवश्यक वस्तू या व अशा विविध बाबींविषयी आपण यापूर्वी सविस्तरपणे जाणून घेतले.
आता आपण या भागात प्रत्यक्ष पायी परिक्रमेच्या प्रवासाची माहिती घेऊया. खरंतर पायी परिक्रमा पूर्ण करण्यास शंभर पेक्षा जास्त दिवस लागतात. हजारो छोटी-मोठी गावे-शहरे, जिल्हे, राज्य लागतात. जलप्रवासही होतो. त्यामुळे ही माहिती प्रचंड मोठी होऊ शकते. अगदी एका दिवसाचा एक भाग लेख होऊ शकतो. म्हणून आपण याची थोडक्यात माहिती घेऊ…
यापूर्वीच्या भागात नमूद केल्याप्रमाणे पायी परिक्रमेची सुरुवात ही कुठल्याही काठावरुन व कुठल्याही घाटावरुन सुरु करता येते. परंतु आपल्या भागातील म्हणजेच उत्तर महाराष्ट्रातील परिक्रमावासिय बर्याचदा ओंकारेश्वर येथून परिक्रमा सुरु करतात. शेवटी तेथेच संकल्पपुर्ती करतात. किंबहुना बरेच परिक्रमावासिय कुठेही वास्तव्य करत असले तरी परिक्रमेची सुरुवात करताना ओंकारेश्वराचीच निवड करतात. कारण ओंकारेश्वर हे एक प्रसिद्ध ज्योर्तिलिंग तर आहेच शिवाय नर्मदा मातेला शिवशंकराची मुलगी मानली जात असल्याने परिक्रमा सुरु करण्यासाठी अनेक भाविक ओंकारेश्वराची निवड करतात. याला स्थानिक लोक ओंकारेश्वरसे परिक्रमा ऊठाई असे म्हणतात. या पायी परिक्रमेत परिक्रमावासिय जेथे मिळेल तेथे भोजन/सदावर्त घेतात.
असे म्हणतात की परिक्रमावासिय अगदी जंगलात जरी राहीला तरी नर्मदा मैय्या त्याला उपाशी झोपू देत नाही. कुठल्या ना कुठल्या मार्गाने भोजनाची व्यवस्था होतेच. या एका श्रद्धेवर परिक्रमावासिय भोजनाबाबत कधीही चिंता करत नाही. मुक्कामाचे बाबतीतही तेच शक्यतो वाटेवरील मंदिर, आश्रम, शाळा, पडवी, ओटा असे जिथे कुठे सोय होईल तेथे राहतात. शक्यतो दोन जोडी कपडे , एक कडीचा डबा व वास्तव्यासाठी ऐक बेडरोल घेतात. सर्व प्रवास पायी असल्याने सामान अत्यंत कमी घेतले जाते. ओंकारेश्वर येथून परीक्रमा सुरु केल्यास परिक्रमेचा मार्ग साधारण असा असतो. यात आपण फक्त मोठ्या व प्रसिद्ध गावांचाच उल्लेख करणार आहोत.
ओंकारेश्वर -टोकसर-रावेरखेडी- बकावा- तेलीया भट्यान- लेपा- शालीवाहन- बडवानी- राजघाट – बावन गजा – पळसुद – निवली – पानसेमल – शहादा – प्रकाशा – सातबरा – मेडीसन – शुलपाणेश्वर – राजपिपला – गोरा गाॅंव – इंद्रवर्ण – गुवार -निळकंठधाम- जगदिशमढि- खारापाणी- अंकलेश्वर – हनसोड- हनुमानटेकडी – कोटेश्वर – विमलेश्वर
तीन तास बोटप्रवास खंबायतखाडी सागरयात्रा
दक्षिणतट ते उत्तरतट
मिठीतलाई – जगरवा – दहेज – केसरोल – भाडभुत- मोटि कोराई – मालेसर – कुबेर भंडारी – कर्णालि – तिलकवाडा – गरुडेश्वर – गढेपाणी – कोटेश्वर – सेमलदा – मांडवगड- महेश्वर – खेडीघाट – चारुकेश्वर – दगडूजी – नेमावर – सलकनपुर – रामनगर- होशंगाबाद – तेंदूखेडा – नरसिंगपुर -बरमानघाट- जबलपुर – हारिपुर घाट – भेडाघाट- ग्वारीघाट- कुंडम- शहापुरा- जोगी टिकरीया – अमरकंटक –
उत्तरतट-दक्षिणतट
दिंडोरी -महाराजपुर – मंडला – लखनादोन- तिलवाडा घाट – गोटेगाॅंव – बरमानघाट – ज्योतेश्वर – नरसिंगपुर – होशंगाबाद -शेठाणिघाट- कोकसर – बिलाडी- गंगासेरी – ओंकारेश्वर.
परिक्रमा पुर्ण…
यानंतर संकल्पपुर्ती – भोजनदान व कन्यापुजन करुन परिक्रमा परिपूर्ण होते.
यापूर्वी नमुद केल्याप्रमाणे नर्मदा परिक्रमेची यात्रा व अनुभूती ही प्रत्येक भाविकाची वेगवेगळी असू शकते. मात्र नर्मदा परिक्रमा ही जीवनाचा नजरीयाॅं बदलणारी असते. त्यामुळे प्रत्येकाने पायी अथवा वाहनाने ऐकदा तरी नर्मदा परिक्रमा करावीच.
नर्मदे हर….