आज आपण राजस्थानातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणाला भेट देणार आहोत. फारसे प्रसिद्धीच्या झोतात नसलेले हे ठिकाण हटके डेस्टिनेशनच आहे. त्यामुळे वेळ न दवडता आपण तेथे जाऊ या…
आपण बघता बघता देशभरातील ४० हटके पर्यटन स्थळांना भेट दिली. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला सदैव मिळत आहेत. त्यामुळे आमचा हुरुप वाढला असून अजून छान छान पण फारशी चर्चेत नसलेल्या पर्यटन स्थळांची माहिती आम्ही आपल्याला देण्याचा पुरेपुर प्रयत्न करु.
राजस्थानची सहल करायची म्हटलं तर पर्यटक नेहमी जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर, बिकानेर , पुष्कर-अजमेर अशा बहुचर्चित पर्यटन स्थळांना भेट देतात. अर्थात राजस्थान हे मोठे राज्य असल्याने या सहलीत असेही ८-१० दिवस लागतात. त्यात कुंभलगड सारखी वेगळी ठिकाणे बघायची ठरवली तर सहलीचे दिवस व पर्यायाने खर्चही वाढत जातो. त्यामुळे पर्यटक प्रचलित ठिकाणी जाण्यास पसंती देतात व कुंभलगड सारख्या गौरवशाली परंपरा लाभलेल्या पर्यटन स्थळावर फुली मारतात. परंतु मी आपणास खात्रीने सांगतो की, आजच्या आपल्या कुंभलगडावरील लेखाने यापुढे राजस्थानात जाणारा प्रत्येक पर्यटक त्याच्या यादीत सर्वप्रथम कुंभलगडचा समावेश करेल……
तुम्ही म्हणाल की असे काय विशेष आहे कुंभलगडमध्ये. होय मंडळी, कुंभलगडची अनेक वैशिष्ट्ये आहेत . त्यापैकी महत्वाची दोन वैशिष्ट्ये म्हणजे कुंभलगडाची जी भिंत आहे ती चीनच्या भिंतीनंतरची जगातील सर्वात मोठी दोन नंबरची लांब व उंच भिंत आहे. ही भिंत ३७ किमी लांब व १५ फूट रुंद आहे. या भिंतीवर पाच-सहा घोडेस्वार आरामशीर गस्त घालत असल्याचा इतिहास आहे. चीनच्या (ग्रेट वाॅल) भिंती बाबतची माहिती भारतीयांना आहे. मात्र, कुंभलगडाच्या अभेद्य भिंतीबाबत आपल्याला फारसे माहिती नसते. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे राजस्थानच्या मेवाड राज्याचा मुकूटमणी ठरलेला, कधीही परकीय आक्रमणास शरण न जाणारा, मेवाडच्या आणि स्वतःच्या आत्मसन्मानास प्राधान्य देणार्या राजा महाराणा प्रताप यांचे हे जन्म ठिकाण आहे.
कुंभलगड बद्दल अजून बरीच अशी माहिती आहे की ती अजून फारशी लोकांपर्यंत पोहचलेली नाही. आपणास माहितच आहे की, राजस्थानचे मेवाड व मारवाड असे दोन भौगोलिक भाग आहेत. यातील मेवाड प्रांतात अरवली पर्वत रांगामध्ये राजसमंद जिल्ह्यात कुंभलगडचा किल्ला आहे. हा किल्ला आजवरच्या इतिहासात फक्त एकदाच परकीयांना जिंकता आला आहे. पंधराव्या शतकापासून राणा कुंभा, राणा उदयसिंग, महाराणा प्रताप अशा विविध पराक्रमी राजपूत राजांनी आपल्या शौर्याची पराकाष्टा करुन मेवाडचा दरारा निर्माण केला.
कुंभलगड बाबत ऐतिहासिक माहिती पुरेशी उपलब्ध नाही. सुमारे सहाव्या शतकात सम्राट अशोकाचा नातू संप्रोती याने कुंभलगडाची निर्मिती केली. त्यावेळी त्याने किल्याच्या पायथ्याशी असलेले गाव मच्छिंद्रपूर मुळे या किल्यास नाव ठेवले मंच्छिंद्रगड. त्यानंतर अनेक वर्षे हा किल्ला एक खंडहर बनला होता. परंतु १५ व्या शतकात राजा राणा कुंभा यांनी हा किल्ला पुनश्च बांधला व किल्याचे नाव ठेवले कुंभलगड. येथून पुढे कुंभलगडचा वैभवशाली व गौरवशाली इतिहास सुरु झाला. अशा या कुंभलगड किल्ल्याचा वर्ल्ड हेरीटेज साईटमध्ये समावेश आहे.
कुंभलगड हा चितोडगड नंतरचा सर्वात मोठा किल्ला मानला जातो. या किल्यास कुणी प्रदीर्घ काळ वेढा दिला व किल्ल्याचा दाणापाणी बंद केला तरी आतील परिसरात गडावरील लोकांची शेती, अन्नधान्य व पाण्याची व्यवस्था होईल इतका हा किल्ला विशाल आहे. इतकी जबरदस्त दूरदृष्टी ठेवून किल्ला बांधला असल्याने तो सदैव अजेय राहिला.
या किल्यात सुमारे ३६० छोटी-मोठी मंदिरे आहेत. यावरुन आपल्याला किल्ल्याच्या भव्य-दिव्येतेचा अंदाज येईल. कुंभलगडचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला अरवली पर्वत रांगेत असल्याने आजूबाजूचा शेकडो किलोमीटरचा परिसर हिरवा आहे. तसेच राजपूत योद्धे याठिकाणी गनिमी कावा करुन शत्रूला जेरीस आणत.
कुंभलगडाच्या मार्गावर अनेक पोल (गेट) आहेत. हे पोल जिंकल्याशिवाय शत्रूला मुख्य किल्ल्यापर्यंत पोहचता येत नव्हते. कुंभलगड किल्ला पर्वतावर बांधला असल्याने व हा परिसर समुद्रसपाटीपासून ११०० फूट उंचीवर असल्याने कुंभलगड हे राजस्थान मधील एक हिल स्टेशन म्हणूनही प्रसिद्ध आहे.
प्रवेश फी
किल्ला पाहण्यासाठी रु. २००/- प्रतिव्यक्ती तिकीट आहे. याठिकाणी सखोल माहिती देणारे गाईड (मार्गदर्शक) मिळतात.
कसे पोहचाल
कुंभलगड येथे विमानाने जाण्यासाठी सर्वात जवळचा विमानतळ उदयपूर येथे आहे. उदयपूर ते कुंभलगड अंतर ८४ किमी आहे. कुंभलगड येथे रेल्वेने जाण्यासाठी ७२ किमीवर राणी हे नजिकचे रेल्वे स्टेशन आहे. कुंभलगड असे या किल्ल्याचे नाव असले व किल्ला डोंगरात असला तरी रस्ते मार्गाने गडाच्या मुख्य दरवाजापर्यंत डांबरी रस्ता आहे. मात्र शेवटी काही अंतर पायी चढावे लागते. परंतु सर्व वयोगटातील व्यक्ती पायी किल्ला बघू शकतात.
केव्हा जाल
कुंभलगड येथे भेट देण्यासाठी साधारण सप्टेंबर ते मार्च हा कालावधी योग्य आहे.
जवळपासची पर्यटनस्थळे
कुंभलगड बरोबरच आपण उदयपूर, एकलिंगजी मंदिर, चित्तोडगड, नाथद्वारा ही ठिकाणे बघू शकतात. यासाठी साधारणतः ५ ते ६ दिवस हवेत.
कुठे रहाल
कुंभलगड परिसरात अनेक छोटी-मोठी हाॅटेल्स आहेत.
आपल्या देशाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला असल्याने देशात गड, किल्ले, महाल, राजवाडे यांची कमतरता नाही. पण एखाद्या राजाने पंधराव्या शतकात प्रजेचे व स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी थोडी-थोडकी नव्हे तर ३७ किलोमीटरची जी अभेद्य भिंत बांधून जे आश्चर्य निर्माण केले त्याला भेट द्यायलाच हवी. त्यासाठी कुंभलगडला जायलाच हवे.
मग कधी येताय?
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!