इंडिया दर्पण विशेष लेखमाला – गुरुवे नमः
तलवारबाजी प्रशिक्षक राजू शिंदे
महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च आणि मानाचे असलेले शिवछत्रपती पुरस्कार विजेते नाशिकमध्ये ७० च्या आसपास आहेत. त्यापैकी तब्बल १५ विजेते हे तलवारबाजी या खेळामधील आहेत. तेही गेल्या फक्त २० ते २२ वर्षांतीलच आहेत हे विशेष! याचे मुख्य श्रेय अर्थातच ज्यांनी नाशिकला या जराशा तांत्रिक आणि सहज कळायला अवघड अशा खेळाची ओळख करुन दिली त्या अशोक दुधारे यांना आहे. कारण त्यांनी ९० च्या दशकात हा ऑलिम्पिक खेळ नाशिकच्या मातीत रुजविला. त्यांच्या प्रमुख शिलेदारांपैकी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे प्रशिक्षक राजू शिंदे. वयाच्या पन्नाशीतील हा क्रीडाशिक्षक खरा हाडाचा प्रशिक्षकच आहे.

लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532
राजू शिंदे याच्या उण्यापुऱ्या २० वर्षांच्या कारकिर्दीतच तलवारबाजी या खेळात नाशिकचे नाव आणि दबदबा वाढला. म्हणूनच दोन वर्षांपूर्वी पर्यंत एक तरी नाशिकचा खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार यादीत हमखास असेच. याचदरम्यान नाशिकचे सर्व गटातील मुलांचे आणि मुलीचे जवळपास सर्व संघ राज्य पातळीवर एक तर विजेते तरी होत किंवा शेवटच्या तीन संघात तरी येत. महाराष्ट्रातील संघ त्यानंतर नाशिकच्या खेळाडूच्या जोरावर राष्ट्रीय स्पर्धेतही छाप सोडून जात. राजूच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमविलेल्या शिष्यांची यादी मोठी लांबलचक आहे. त्यातील ही काही नावे – अजिंक्य दुधारे, ऋत्विक शिंदे, रोशनी मुर्तडक, आदिती सोनवणे, शंतनू पाटील, सिद्धेश पाटील, शरयू पाटील, अक्षय देशमुख , भूषण शिर्के , आश्विन दाभाडे आदी
हे सर्व खेळाडू वेगवेगळ्या गटात epee, foil आणि sabre या तलवारबाजी किंवा fencing मधील खेळात राज्य किंवा राष्ट्रीय विजेते झाले आहेत. अजिंक्य दुधारे तर १० आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतातर्फे खेळलेला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय पदकही जिंकले आहे. गेल्या काही वर्षांपासुन तो India Camp राष्ट्रीय महासंघाच्या आमंत्रित संभाव्य खेळाडूत पतियाळा येथे राष्ट्रीय शिबीरात सराव करीत असतो. त्याचे बेसिक हे शिंदे सरांनी पक्के करून घेतले त्याचे हे फळ आहे हे निश्चित. राजूचे तलवारबाजी मधील अद्ययावत ज्ञान, अनुभव आणि खेळाडूसह असलेला स्नेहबंध, खेळाडूंना योग्य मार्गदर्शन, मुख्यतः महत्त्वाच्या सामन्यात आणि महत्त्वाच्या वेळी केलेले अचूक मार्गदर्शन हे अतिशय उपयुक्त ठरले आहे. असे त्याचे शिष्य सांगतात. त्याच्या याच गुणांमुळे आजवर त्याने चारवेळा महाराष्ट्राच्या प्रमुख प्रशिक्षकपदी काम केले आहे. तसेच, चांगले यशही मिळविले आहे.
अनेकवेळी त्याची राष्ट्रीय तंत्रिक समितीतही निवड झाली आहे. राजू शिंदेला नाशिकमधून एक तरी ऑलिम्पियन घडवायचा आहे. त्याचे वय, ज्ञान आणि अनुभव बघता ते स्वप्न साकार होण्याची शक्यता आहे. पण त्याच्या शांत आणि प्रसिद्धीपासून दूर राहण्याच्या स्वभावानुसार तो बोलून दाखविणार नाही तर करून दाखविल. तसेच यदाकदाचित तसे घडले नाही तरी तो निराश होणार नाही. नव्याने प्रयत्न करेल कारण तो आतून जिद्दी आणि आशावादी आहे.