विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील सर्व २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमार्फत सुरक्षा परीक्षण करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.देशमुख म्हणाले की, सुरक्षा परिक्षणाची कार्यवाही तात्काळ सुरु होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, संलग्नित संस्थांचे सुरक्षा परीक्षण (safety audit) (अग्नि प्रतिबंधात्मक लेखापरीक्षण व करावयाच्या उपाययोजना इत्यादी.) केंद्र शासनाच्या श्रम व रोजगार (Ministry of Labour and Employment) मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील स्वायत्त स्वरूपाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद (National Safety Council) या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. या सुरक्षा परिक्षणासाठी साधारणपणे ३७ लाख २२ हजार २८० रुपये खर्च होणार आहे. हे सुरक्षा परीक्षण रुग्णालयीन सुधारणा, रुग्णहित, विद्यार्थी, मनुष्यबळ सुरक्षास्तव आवश्यक असल्याने करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.देशमुख यांनी दिली.
या संस्थांचा आहे समावेश
या शासकीय महाविद्यालयांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगांव, विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था, लातूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय, नागपूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रुग्णालये, मुंबई, परिचर्या प्रशिक्षण संस्था, मुंबई, सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर, आरोग्य पथक, सावनेर, जि.नागपूर, डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड, डॉ.वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, सोलापूर, आरोग्य पथक, तासगांव, जि. सांगली, राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर, श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे, आरोग्य पथक, पैठण, जि. औरंगाबाद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तथा कर्करोग रुग्णालय, औरंगाबाद आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोला या २२ वैद्यकीय महाविद्यालयांचा आणि रुग्णालयांचा समावेश आहे.