अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहूजन कल्याण विभाग यांच्यामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांकरीता सन २०२२-२३ मध्ये नवीन व नुतनीकरण अर्ज व २०२१-२२ चे नोंदणीकृत केलेले अर्ज रिअप्लाय करण्यासाठी अर्ज प्रक्रियेस ३० एप्रिल २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करून अर्ज भरता येणार आहे. असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
जिल्हयातील सर्व शासनमान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालये प्राचार्य व या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती (SC), इतर मागास प्रवर्ग ( OBC), विमुक्त जाती भटक्या जमाती (VJNT ) व विशेष मागास प्रवर्गातील (SBC) विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. सन २०२२-२३ यावर्षासाठी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी- परीक्षा फी, व्यावसायिक पाठयक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती इ. योजनांचे नवीन (Fresh) व नुतनीकरण (Renewal) चे अर्ज भरता येणार आहेत.
प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढणेकरीता यापूर्वी ३१ मार्च २०२३ ही अंतिम दिनांक देण्यात आलेली होती, परंतु प्रतिवर्षीची नोंदणीकृत अर्ज संख्या लक्षात घेता या वर्षीची अर्ज संख्या तुलनेत कमी असल्याने सन २०२२-२३ चे नवीन अर्ज व नुतनीकरण (Fresh / Renewal ) व सन २०२१-२२ चे नोंदणीकृत केलेले अर्ज Re- apply करण्याची मुदत ३० एप्रिल २०२३ पर्यंत देण्यात आलेली आहे. तरी सर्व संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, शिष्यवृत्तीचे कामकाज पाहणारे कर्मचारी व शिष्यवृत्ती धारक पात्र विद्यार्थी यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक भरुन मंजूरीसाठी या कार्यालयास प्रथम प्राधान्याने विहीत मुदतीत ऑनलाईन सादर करण्याचे आवाहनही श्री.देवढे यांनी केले आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी महाडिबीटीवर यापूर्वी आधार संलग्नित युजर आयडी तयार करुन अर्ज भरलेले आहेत त्यांनी नवीन नॉन आधार युजर आयडी तयार करु नये. नवीन नॉन आधार युजर आयडीवरुन अर्ज नुतनीकरण केल्यास व एका पेक्षा जास्त युजर आयडी तयार केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी व महाविद्यालयांची राहील.
अर्ज भरण्याबाबत काही तांत्रिक अडचणी असल्यास आपण प्रवेशीत असणा-या महाविद्यालयाशी संपर्क साधावा किंवा सदरच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या Grievance / Suggestions या टॅबद्वारे आपली अडचण संकेतस्थळावर नोंदविण्यात यावी. विहीत मुदतीत कार्यालयास अर्ज प्राप्त न झाल्यास / विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांची राहील व त्यास सामाजिक न्याय विभाग तसेच इतर मागास बहूजन कल्याण विभाग जबाबदार राहणार नाही. असेही देवढे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
College Student Scholarship Social Welfare Department