नाशिक – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येवून कोणताही बाधित रूग्ण उपचारापासून वंचित राहू यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने सर्व विभागांच्या समन्वयाने ग्रामीण भागात रेमडेसिव्हिर व ऑक्सिजन यांचा आवश्यक प्रमाणात सुरळीत पुरवठा होण्यासाठी मदत होत आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
आज जिल्हा सामान्य रूग्णालय, नाशिक, देवळा व सटाणा तालुक्यांना भेट देवून तेथील कोरोना सद्यस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी देवळा व सटाणा तालुका येथे मालेगावचे अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, चांदवडचे उपविभागीय अधिकारी सी. एस. देशमुख, सटाणा उपविभागीय अधिकारी विजयकुमार भांगरे, तहसिलदार दत्तात्रय शेजुळ, जितेंद्र इंगळे, जिल्हा सामान्य रूग्णालय नाशिक येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, कोरोना नोडल अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. निलेश जेजुरकर, मुख्य प्रशासकीय अधिकारी व्हि. डि. पाटील, सटाणा मुख्याधिकारी हेमलता ढगळे, सटाणा गट विकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, सटाणा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत अहिरराव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या भेटी दरम्यान पाहणी करतांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, सामान्य रूग्णालयातील २० केएल ऑक्सिजन टँकमार्फत ऑक्सिजनचा योग्य पद्धतीने व सुरळीत पुरवठा होण्यासाठी नियोजन करण्यात यावे. तसेच जिल्ह्यात शासकीय कोविड रूग्णालयातील व्हेंटिलेटर, ऑक्सिजन काँन्सट्रेटर आणि नियोजित केलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित होतील असे पहावे. त्याचप्रमाणे सामान्य रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्णांसाठी 150 खाटांची व्यवस्था करण्यासाठी नियोजन करण्यात येवून त्याबाबत इमारत दुरूस्ती विषयक आवश्यक कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत करावी. जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिटचे काम पूर्ण झाले असून त्याचा प्रस्ताव संचालक आरोग्य सेवा यांचे कडे गेला आहे त्याचा पाठपुरावा करावा व तोपर्यंत किमान ज्या अत्यावश्यक बाबी आहेत त्यांची पूर्तता स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडून आगामी दोन दिवसात करून घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले. आगामी दोन दिवसात जिल्हा रुग्णालयामध्ये फायर मॉक ड्रिल ठेवण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी दिल्या.
जिल्हा सामान्य रुग्णलयाच्या पाहणी नंतर जिल्हाधिकारी यांनी देवळा व सटाणा तालुक्यांना प्रत्यक्ष भेट देवून तेथील कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले की, सर्व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्स (डी.सी.एच.सी.) व दवाखान्यांचे ऑक्सिजन ऑडीट करण्यात येवून रुग्णास केला जाणारा ऑक्सिजनचा पुरवठा विहीत प्रमाणात करण्यात यावा. त्याचप्रमाणे आवश्यकता असणाऱ्या रुग्णांनाच योग्यती काळजी घेवून रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा वापर होत असल्याबाबत सर्व वैद्यकीय अधिकारी व डॉक्टरा यांनी खात्री करावी. तसेच ऑक्सिजनचा आणि रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा वापर योग्यरितीने होतो किंवा कसे यावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना दिले आहेत.
यावेळी तालुक्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या माहितीचा आढावा घेवून आरोग्य विभाग आणि इतर शासकीय विभागातील ज्या कर्मचाऱ्यांचा लसीकरणाचा दुसरा डोस घेणे बाकी असेल अशा कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्याबाबत उचित कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी दिल्या आहेत.
याबैठकीनंतर जिल्हाधिकारी यांनी देवळा ग्रामीण रुग्णालय व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला (डी.सी.एच.सी.) भेट देवून तेथील रुग्णांसोबत संवाद साधला. दोन्ही तालुक्यातील दोन दोन खासगी रुग्णालयांना जिल्हाधिकारी यांनी भेट दिली व तेथील रेमडेसिविर वापराबाबत व ऑक्सिजनच्या वापराबाबत पडताळणी केली. सटाणा तालुक्यातील एका खाजगी दवाखान्यातील रेमडेसिविर चे वापराबाबत तफावत आढळून आल्यामुळे या रुग्णालयाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांना दिले.