इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– स्वयंपाकघरातील वनस्पतींचे महत्त्व –
भाग २ — खोबरे (नारळ)
पहिल्या भागात आपण मोहरीचे महत्त्व जाणून घेतले. आज आपण खोबरे (नारळ)चे महत्त्व, त्याचे विविध उपयोग जाणून घेणार आहोत. नारळ हे अतिशय पौष्टिक आहे. त्याचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे.
भारतीय स्वयंपाक घरात मोठ्या प्रमाणावर नारळ वापरला जातो. रोजच्या स्वयंपाकात जो कोरडा मसाला वापरला जातो त्यात नारळ असतोच. तसेच समुद्र किनारपट्टीच्या प्रदेशात व इतरत्र पण स्वयंपाकात ओला नारळ पण खूप वापरतात. अशा प्रकारे सुका व ओला दोन्ही प्रकारे नारळ वापरला जातो. याचा १५-२० मी. उंच वृक्ष असतो. नारळाच्या वृक्षाचे सर्व भाग उपयुक्त असतात. म्हणून त्याला कल्पवृक्ष असेही म्हटले जाते.
नारळ फळाच्या पक्वतेनुसार तीन अवस्था दिसून येतात. १) बाल (कोवळा) – आत केवळ पाणी ,२) मध्य – आत पाणी व थोडा मऊ गर ३) पक्व – मज्जा कडक होते व पाणी कमी होते. ( शेवटी गर आतच वाळून त्याचा गोटा होतो हेच सुके खोबरे होय.) ओला व सुका दोन्ही नारळ स्वयंपाकात वापरला जातो.
गुण :- नारळ गोड, स्निग्ध (तेलकट) व थंड गुणांचा आहे.
उपयोग :-१)नारळ मूत्रदाह , पित्त कमी करते.
२) नारळाचे खोबरे मांस , मेद ,मज्जा व अस्थी वाढवते. शाळकरी वयातील मुलांनी रोज नारळ खावा. तो शक्तिवर्धक,बुद्धीवर्धक आहे.
३) केस व मेंदूच्या वाढीसाठी नारळ खूपच उपयुक्त असतो.
४) नारळामुळे हाडांना बळकटी येते.
५) शरीरातील कोरडेपणा नाहिसा होतो. वजन वाढत नसल्यास रोज खोबरे खाल्ल्याने वजन वाढते
६) नारळाने विशेषत:शहाळ्याच्या पाण्याने मूत्रप्रवृत्ती साफ होते. मूत्रदाह कमी होतो.
७) नारळाचे पाणी थंड,भूक वाढवणारे, पचायला हलके आहे. सारखी सारखी तहान लागणे, पित्त होणे हे त्रास त्यामुळे कमी होतात.
८) नारळ केसांसाठी उत्तम टॅानीक आहे. केस गळणे, कोरडे भरभरीत होणे ,कोंडा होणे यावर नारळाचे तेल केसांना लावावे व १ चमचा तेल पोटांत घ्यावे.
८) भाजले असता, बीब्बा उतल्यास त्यावर खोबऱ्याचे तेल लावावे.
९) पिंपल्सवर नारळाची करवंटी , सुंठ ,जायफळ उगाळून त्याचा लेप लावावा.
१०) वातामुळे अंगदुखी, सांधेदुखी असते तेंव्हा १ चमचा नारळाचे तेल अनशा पोटी कोमट पाण्यातून प्यावे. हे तेल घरी करता येते.त्यासाठी नारळाचे दुध काढून ते फ्रिजमध्ये ठेवावे. ५-६ तासांनी वर आलेली घट्ट साय वेगळी काढून घ्यावी.व तूपासारखे अग्नीवर ठेवून कढवावे. शेवटी तेल वर येते व बेरी खाली बसते. हे तेल पोटातून घ्यायला वापरावे. हे तेल कृमिनाशक म्हणूनही उपयोगी पडते. लहान मुलांनापण द्यावे.
११)कोवळे नारळ म्हणजे शहाळे .ते पित्त ,तहान, ताप कमी करते.
१२) लहान मुलांमध्ये वजन वाढवण्यासाठी रोज सकाळी गुळ खोबरे खाण्यास द्यावे.
१३) हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रोज खारीक खोबरे यांची पूड दूधातून घ्यावी.
१४) मेंदूचे आरोग्य चांगले राखण्यासाठी रोज नारळ खाण्यात ठेवावा.
१५) दातांचे आरोग्य नारळामुळे चांगले राहते. दातांच्या सर्व तक्रारींसाठी रोज खोबऱ्याच्या तेलाचा गंडूष करावा.म्हणजे तेलाची गुळणी तोंडात धरून ठेवावी. खोबरे दातांनी चावून चावून खावे. वारंवार तोंड येण्याची तक्रार यामुळे नाहीशी होते.
१६) संडासच्या जागी आग ,खाज येत असेल खोबऱ्याच्या तेलाचा बोळा झोपतांना तिथे ठेवावा.
१७) स्त्रीयांच्या योनी भागांत आग, खाज येत असेल तर तिथेही खोबऱ्याचे तेल लावावे किंवा बोळा ठेवावा.
हे लक्षात ठेवा
१) नारळ पचायला जड आहे. सुके खोबरे तर जास्तच जड आहे, तसेच अतिप्रमाणात खाल्ल्यावर मलावष्टंभ , पोटफुगी होते. पित्त होणे , जळजळ होणे हे त्रास पण त्यामुळे होऊ शकतात. त्यामुळे नारळ प्रमाणातच खावा.
नारळाच्या पाककृती :———
१) नारळाच्या वड्या :-
साहित्य – खोवलेला नारळाचा चव २ वाट्या , खडीसाखरेची पिठीसाखर दिड वाटी , सायीसहित दूध १ वाटी , दालचिनी पूड १/४ चमचा , वेलदोडा पूड १/४ चमचा , जायफळ पूड १/६ चमचा , तमालपत्र १/४ चमचा , नागकेशर १/४ चमचा
कृती:- नारळ , साखर , दूध एकत्र करून शिजायला ठेवावे. घट्ट गोळा फिरू लागल्यावर त्यात दालचिनी , वेलदोडा , तमालपत्र , नागकेशर व जायफळ घालावे. एका ताटाला तूप लावून त्यावर घट्ट झालेले मिश्रण थापावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.
या वड्या पित्त कमी करतात. ,उलटी, तोंडाला चव नसणे, पोट दुखणे यात उपयोगी पडतात. गर्भीणी अवस्थेत तसेच लहान मुलांसाठी पौष्टिक खावू म्हणून उपयोगी पडतात.
२) नारळाचे कोफ्ते :—
साहित्य – नारळ चव १ वाटी , ४ हिरव्या मिरच्या , आले पाव इंच , लसून पाकंळ्या १० , धने पूड २ चमचे, तीळ ४ चमचे , हिंग १/४ चमचा , हळद , १/२ चमचा , हरभरा दाळीचे पीठ ४ टे. स्पून , भाजणीचे पीठ ३ टे. स्पून , मीठ चवीप्रमाणे. बारीक चीरलेली कोथींबीर १/२ वाटी
कृती : – नारळाच्या चवामध्ये मिरच्या, लसून, आले घालून मिक्सरवर फिरवून घ्यावे. त्यात तीळ ,हिंग इ .घालावे. दोन्ही पीठे घालावीत. कोथिंबीर घालावी.चांगले एकत्र करून घ्यावे. कढईत तेल घालून कडकडीत गरम झाल्यावर मिश्रणाचे छोटे छोटे चपटे गोळे करून मंद अग्नीवर तळून घ्यावे. गरम गरम खायला द्यावे. हेच गोळे आपण तूरडाळीची आमटी करून त्यात पण टाकून पण खावू शकतो. ही गोळ्यांची आमटीपण अतिशय चविष्ट लागते.
डॉ. नीलिमा हेमंत राजगुरु
आयुर्वेदाचार्य मो. 9422761801.
ई मेल – drneelimarajguru@gmail.com
Coconut Water Benefit Nutrition Health by Dr Neelima Rajguru