नवी दिल्ली – देशात सध्या कोळसा टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम वीजेच्या निर्मितीवर झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा प्रश्न अतिशय हॉट बनला आहे. विविध राज्यांकडून केंद्र सरकारकडे बोट दाखविले जात आहे तर केंद्राकडून राज्यांकडे. मात्र, देशात कोळशाचे संकट अचानक निर्माण झाले का, त्याची नेमकी काय कारणे आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे.
मुसळधार पावसामुळे कोळशाची टंचाई निर्माण झाली असून, त्यामुळे आंतरराष्ट्रीय किमती वाढल्या आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये विजेचे संकट निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही माहिती दिली. आयात केल्या जाणार्या कोळशावर अवलंबून असलेले औष्णिक वीज प्रकल्प ठप्प झाले आहेत. किंवा त्यांची वीज उत्पादन क्षमता कमी झाली आहे. परिणामी घरगुती कोळशावरील अवलंबिता वाढली आहे, असे केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.
अनेक औष्णिक वीज प्रकल्पांची थकबाकी असतानाही त्यांना केंद्राकडून कोळशाचा पुरवठा केला जात आहे. राज्यांना साठा वाढविण्याच्या सूचनाही केल्या जात आहेत. कोळशाचा तुटवडा नाही, असे जोशी यांनी स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी देशात कोळशाच्या तुटवड्यामुळे बत्ती गुल होत असल्याच्या आरोपांना त्यांनी फेटाळले होते.
या कारणांमुळे वीजसंकट
१) सप्टेंबरमध्ये कोळशा खाण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे कोळसा उत्पादनासह खाणीतून कोळशाच्या परिवहनावर प्रतिकूल परिणाम झाला.
२) आयत केल्या जाणार्या कोळशाच्या किंमतीत वाढ झाली. या कोळशावर अवलंबून असलेले वीज संयत्र बंद होण्याच्या मार्गावर किंवा त्यांचे वीज उत्पादन घटले.
३) मॉन्सूनची सुरुवात होण्यापूर्वी पुरेसा कोळसा साठवण्यास कंपन्यांना अपयश आले.
४) महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या कोळसा कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी.
५) कोविडच्या दुसर्या लाटेनंतर अर्थव्यवस्थेने उभारी घेतल्याने विजेची मागणी आणि पुरवठ्यात वाढ झाली.