नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सेंट्रल व्हिस्टा या संसदेच्या नवीन इमारतीत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार असल्याची, माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. शिंदे दिल्ली भेटीवर असून आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथग्रहण समारंभात ते सहभागी झाले होते. यानंतर महाराष्ट्र सदनात माध्यमांशी बोलताना श्री शिंदे यांनी ही माहिती दिली. संसदेच्या नवीन इमारतीत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी तसेच महाराष्ट्र सदनात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसविण्यात यावा, या मागणीबाबातचे राज्यातील खासदारांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन आपणास निवेदन दिल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
इंडिया गेट परिसरात बांधण्यात येत असलेल्या संसदेच्या नवीन इमारतीत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यात यावी या संदर्भात आपण स्वत: आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून या मागणी संदर्भात निवेदन देणार असल्याचे श्री शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. या मागणीबाबत पंतप्रधान महोदय सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वासही श्री. शिंदे यांनी व्यक्त केला. कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसविण्याची मागणीही राज्यातील खासदारांच्या शिष्टमंडळाने केली असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील उमेदवारांसाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात निवास व्यवस्था करण्याची मागणी या उमेदवारांनी केलेली आहे. या उमेदवारांची दिल्लीत राहण्याची गैरसोय होऊ नये या संदर्भात कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात तत्काळ १०० ते १५० उमेदवारांच्या व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. यासह येणा-या काळात सदनातील आरक्षित भूखंडावर ५०० ते ६०० उमेदवारांची निवास व्यवस्था करण्यासंदर्भात आरखडा तयार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला केल्या असल्याचे श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
CM Shinde On Balasaheb Thackeray Image In New Parliament Building