मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवीन वर्ष नव्या आशा-आकांक्षा घेऊन येते, नव संकल्पनांची प्रेरणा देते. येणारे २०२३ हे नववर्ष आशा-आकांक्षा सत्यात आणणारे, नवसंकल्पना साकारण्यासाठी बळ देणारे ठरेल. आपला महाराष्ट्र कष्टकरी, कामगार, शेतकऱ्यांच्या संकल्पनांवर, त्यांच्या मेहनतीवर उभा आहे. आगामी वर्षातही अशाच नवसंकल्पना साकारण्यासाठी आणि त्यातून आपला महाराष्ट्र आणखी संपन्न, समृद्ध करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न करुया, या विश्वासासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, सरते वर्ष खूप काही शिकवून जाते. तर नवीन वर्ष आपल्या मनात नव्या आशा-आकांक्षा निर्माण करते. यातून नव्या संकल्पना राबवण्याची प्रेरणा मिळते. आपल्या आधुनिक महाराष्ट्राची उभारणी अशा संकल्पनाच्या जोरावर शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या मेहनतीतून झाली आहे. आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. महाराष्ट्र देशातील उद्योग-व्यापार, कृषी, शिक्षण अशा सर्वच क्षेत्राचे नेतृत्व करत आहे. देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ महाराष्ट्र आहे. गत दोन वर्षात अनेक संकटं, अडचणी आल्या. या सगळ्याचे मळभ दूर करत आता आपण नव्या दमानं वाटचाल सुरु केली आहे. ही वाटचाल आपला आत्मविश्वास वाढवणारी आहे. हाच आत्मविश्वास घेऊन आपला महाराष्ट्र आणखी संपन्न, समृद्ध व्हावा यासाठी प्रयत्न करूया. त्यासाठी आपल्या सर्वांची एकजूट करूया. नवे वर्ष सर्वांच्या आकांक्षा पूर्ण करणारे ठरावे. नवे वर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात उत्तम आरोग्याचे आणि संपन्नतेचे पर्व घेऊन येवो, अशी मनोकामना व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सर्वांना नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
CM Eknath Shinde New Year Wishes