मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड शहरासाठी अत्यंत महत्वपुर्ण समजल्या जाणा-या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण-मनमाड पाणी पुरवठा योजनेचा भूमीपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मनमाड येथे होत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्य़मंत्र्यांसह उद्योगमंत्री उदय सामंत, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा येणार असल्याची माहिती आमदार सुहास कांदे यांनी दिली आहे. तब्बल ३७५ कोटींच्या निधीतून ही योजना १८ महिन्यात पूर्ण होणार आहे. सध्या ११ किमी पाईप लाईन टाकण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री नांदगाव मतदारसंघातील अन्य कामांचे उद्घाटन व काही कामांचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांचे हस्ते करण्यात येणार आहे.
मनमाड शहर गेल्या ५० वर्षांपासून पाणी टंचाईशी झुंजत आहे. पण, येथील पाणीप्रश्नाकडे कधीही गंभीरपणे लक्ष दिले गेले नाही. पण, आ. सुहास कांदे यांनी या योजनेचा पाठपुरावा करुन ती मंजुर करुन त्याचे कामही सुरु केले. या योजनेतून शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटू शकणार आहे. रेल्वेचे मोठे जंक्शन व मध्यवर्ती ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या मनमाड शहारात पाण्याचा प्रश्न हा नेहमी कळीचा मुद्दा होता. सुमारे एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या शहरातील नागरिकांना शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या वागदर्डी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. १९७४ साली या धरणाची निमिर्ती करण्यात आली. त्यावेळी शहराची लोकसंख्या सुमारे तीस ते चाळीस हजार होती. त्यामुळे लोकांना रोज पाणी मिळत होते.
कालांतराने शहराची लोकसंख्या वाढत गेल्यामुळे १९८७ साली पालखेड धरणातून सुमारे ९ कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन सुरू झाली. पालखेड धरणातून रोटेशनद्वारे पाटोदा साठवणूक तलावात पाणी घेतले जाते. तेथून पंपिंग करुन सदर पाणी वागदर्डी धरणात आणल्यानंतर शहरात वितरीत केले जाते. वागदर्डी धरणाची अगोदर ९० दशलक्ष घनफूट क्षमता होती. त्यानंतर सांडव्याची भिंत वाढविण्यात आल्यामुळे धरणाची क्षमता ११० दशलक्ष घनफूट झाली. असे असले तरी धरण बांधल्यापासून त्याच्यातून गाळ काढण्यात आला नाही. तर धरणाऱ्या पाणलोट क्षेत्राच्या स्त्रोताच्या ठिकाणीच अनेक गावात पाझर तलाव बांधण्यात आल्यामुळे हे धरण लवकर भरतच नाही. त्यामुळे ७४ किमी अंतरावर असलेल्या पालखेड डाव्या कालव्यातून मनमाडच्या धरणाला पाणी रोटेशनद्वारे मिळते या पाण्यावरच शहराला पूर्णपणे अवलंबून रहावे लागते. पण, आता या योजनेमुळे थेट पाणी मिळणार आहे.
रेल्वेचे जंक्शन, आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे भारतीय अन्न महामंडळाचे धान्य साठवण ठेवणारे डेपो, ऐतिहासिक रेल्वे वर्कशॉप, विविध ऑईल कंपन्यांचे प्रकल्प, आणि शीख धर्मियांच्या सुप्रसिद्ध गुरुद्वारेमुळे मनमाड शहराची देशाच्या नकाशावर आगळीवेगळी ओळख आहे. इतक्या वेगवेगळ्या अर्थांनी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण सध्या पाणीटंचाईचे माहेरघर म्हणूनही या शहराला ओळखले जाते. पण, पाण्यामुळे शहराचा विकास खुंटला होता. पण, आता या योजनेमुळे विकासाला चालणा मिळणार आहे. त्यामुळे या महत्वपूर्ण योजनेचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
बघा या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण
Cm Eknath Shinde Manmad MLA Suhas Kande Water project