मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याचे वावडे उठले असताना अजित पवार यांनी पुण्याच्या कार्यक्रमात साऱ्या अफवा असल्याचे जाहीर करून आम्ही एकत्र आहोत, असे सांगितले. पण मुख्यमंत्री म्हणून शिंदे अस्वस्थ होतेच. आता मात्र शिंदे अॅक्शन मोडमध्ये आले असून फाईल्स पास करण्याचा एक नवा क्रम ठरविण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इतर कामांमध्ये व्यस्त असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठका घेतल्या. या सर्व बैठका मुख्यमंत्र्यांच्या अख्त्यारित येणाऱ्या विभागातील होत्या. त्यामुळे अजितदादा मुख्यमंत्र्यांना क्रॉस करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे वाटू लागले होते. याशिवाय मुख्यमंत्रीपदाच्या खूर्चीवर अजितदादा आणि फडणवीस यांचा डोळा असल्याचेही बोलले गेले. त्यावरही अजितदादांनी पुण्यात स्पष्टीकरण दिले होते.
या संपूर्ण कालावधीत प्रकृती खराब असल्याने मुख्यमंत्री कामापासून जरा लांब होते. त्यानंतर तिघांनी एकत्र येऊन काही कार्यक्रमही केले. आता मात्र अचानक मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये आले असून फाईल्स पास करण्याचा एक क्रम लावण्यात आला आहे.
यामध्ये कुठल्याही विभागाची फाईल आता अजित पवार यांनी ओके केल्यानंतर ती फडणवीस यांच्याकडे येईल आणि त्यानंतरच मुख्यमंत्र्यांकडे जाईल, असे ठरविण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री म्हणून आपण मुख्यमंत्र्यांच्याच नव्हे तर सर्वच विभागांच्या बैठका घेऊ शकतो, असे दादांनी ठणकावून सांगितले होते. मात्र आता या निर्णयामुळे त्यांना मोठा धक्का बसणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच यासंदर्भातील निर्देश सर्वांना दिले आहेत. त्यांनी सर्व विभागांच्या बैठकाही घेतल्याचे बोलले जात आहे.
१५ विषय व्हाया फडणवीस
राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत चर्चेला येणाऱ्या १५ विविध विषयांवरील फाईल्स उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गानेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत. यामध्ये नवीन कर बसविणे, महसुली उत्पन्नाचे प्रस्ताव, विधीमंडळातील विधेयके, मूल्य निर्धारण करणे, नवीन कर्ज काढणे, चौकश्यांचे अहवाल आदी विषयांचा समावेश आहे.
CM Eknath Shinde Action Mode NCP Ajit Pawar Politics